मन गहिवरणारी निरोपाची भेट

By admin | Published: January 19, 2017 11:17 PM2017-01-19T23:17:10+5:302017-01-19T23:17:10+5:30

पाच दिवसात जडले आत्मियतेचे नाते : आॅस्ट्रेलियन विद्यार्थ्यांना निवजेवासीयांचा निरोप

Gift of Mannaravarari Niropa | मन गहिवरणारी निरोपाची भेट

मन गहिवरणारी निरोपाची भेट

Next



विजय पालकर ल्ल माणगाव
ते सर्व आॅस्ट्रीलियन, पण इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे येथे राहिले. या पाच दिवसात ते गावकऱ्यांच्या हृदयात कधी न विसरणारे स्थान निर्माण करून गेले. पाच दिवसानंतर त्यांना बुधवारी निरोप देण्यात आला पण या विद्यार्थ्यांना निरोप घेताना आपली आसवे रोखता आली नाही. यावेळी निवजेतील भावनाविवश झालेल्या ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा येण्याचे आवतान देत जणू आपली स्वत:ची मुलेच परदेशी जात असल्याप्रमाणे त्यांना विविध भेटवस्तू आणि खाद्यपदार्थ देऊन माणुसकीचा गहिवर जोपासला.
इंजिनिअर विदाउट बॉडर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शाखेतर्फे आस्ट्रेलिया येथील विद्यार्थ्यांचा निवजे ता. कुडाळ या गावी पाच दिवस अभ्यास भेट होती. या पाच दिवसात विद्यार्थ्यांनी गावातील विविध घटकांचा सर्वांगीण अभ्यास केला. यात ग्रामीण जीवन कसे असते हे अनुभवण्यासाठी अठरा विद्यार्थी दोन दोनच्या गटाने निवजेमधील घराघरात पाहिले. अश्रू ओसंडून वाहणाऱ्या या विद्यार्थ्यांनी तर गावकऱ्यांना दिलेले आलिंगण नातेसंबंधाची विण घट करणारी होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपली भावना व्यक्त करताना इथल्या आदरातिथ्याचे कौतुक केले. पाच दिवसाच्या अनुभवातून भारतीय संस्कृतीचा आणि माणुसकीचा पाझर खूपच भावला. त्यामुळे आगामी काळात जीवन जगताना हा अनुभव म्हणून वापरात येईल असे सांगितले.
या छोट्याखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र पिंगुळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. देवधर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी पालव यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुधीर राऊळ यांच्या घरी निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)
प्रेमाची भेट : लाकडी खेळणी
पाच दिवसाचा अभ्यास करण्यासाठी आलेले हे विद्यार्थी आबालवृद्धांमध्ये एवढे मिसळले की गावकऱ्यांना ती आपल्या गावचीच मुले भासू लागली. या पाच दिवसात त्यांनी ग्रामीण जीवनाचा जो अभ्यास केला, त्याचे सादरीकरण ते आपल्या देशात करतील. यातून त्या भारतातील ग्रामीण जीवनाचे दर्शन पुन्हा एकदा नव्या रूपाने आपल्या देशवासियांनी दाखवून देतील. पाच दिवसाच्या भेटीनंतर निवजे गावचे ग्रामस्थ यांनी त्यांना निरोप देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम ठेवला आणि आपली प्रेमाची भेट म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी दिली.

Web Title: Gift of Mannaravarari Niropa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.