मुलींच्या वसतीगृहाप्रश्नी जनहित याचिका दाखल
By admin | Published: July 8, 2014 12:32 AM2014-07-08T00:32:20+5:302014-07-08T00:34:42+5:30
महेश परूळेकर यांची माहिती
कणकवली : वेंगुर्ले येथे साडेतीन कोटी रूपये खर्च करून मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचा वापर होत नसल्याने दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती समितीचे जिल्हा निमंत्रक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वसतीगृहाची इमारत गेली तीन वर्षे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. तांत्रिक कारणे देत जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडून याबाबत निर्णय घेण्यास चालढकल करण्यात येत आहे.
दरवर्षी १०० मुलींना या वसतीगृहात प्रवेश देण्यात आला असता तर आतापर्यंत ४०० मुलींना या वसतीगृहाचा लाभ झाला असता. मात्र या मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
२६ जूनला या इमारतीचे प्रतिकात्मक उद्घाटन संघर्ष समितीच्या पुढाकाराने करण्यात आले. मात्र वसतीगृह प्रत्यक्षात सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनाही याबाबत काहीच देणेघेणे उरलेले नसून जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाची त्यांना कदर नाही असेच यावरून दिसून येते.
त्यामुळे दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने अॅड. अमृता पाटील व अॅड. विरेंद्र नेवे यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मुलांना न्याय मिळवून देणार असल्याचे श्री. परूळेकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)