स्वच्छतेसाठी मुलींनीच पुढाकार घ्यावा
By admin | Published: March 14, 2016 11:17 PM2016-03-14T23:17:21+5:302016-03-15T00:20:37+5:30
नंदिनी देशमुख : सरस्वती हायस्कूलला स्वच्छतागृह प्रदान
नांदगांव : एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या ब्रीदवाक्यानुसार मुलींनी पुढे यायला हवे. ग्रामीण भागातील मुलींच्या स्वच्छतागृहासाठी आम्ही निधी गोळा करून स्वच्छतागृह उभे केले असून, त्याची योग्य प्रकारे स्वच्छता राखणे आता तुम्हा मुलींची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब मुंबईच्या अध्यक्षा डॉ. नंदिनी देशमुख यांनी केले. नांदगाव येथील सरस्वती हायस्कूलला रोटरी क्लबतर्फे स्वच्छतागृह प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने डॉ. नंदिनी देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुखदा प्रोजेक्टअंतर्गत मुंबईच्या रोटरी क्लबने नांदगाव हायस्कूलला भासणारी स्वच्छतागृहाची गैरसोय दूर केली.
यावेळी व्यासपीठावर सल्लागार गव्हर्नर डॉ. राजेश दवे, नांदगांव हायस्कूलचे चेअरमन नागेश मोरये, दिलीप मुळे, मानसी नांदगावकर, अरुण पुराणिक, पुष्पा नांदगावकर, सुनील आंबेरकर, कणकवली
रोटरी क्लबचे अॅड. दीपक अंधारी, नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एन. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नागेश मोरये म्हणाले की, आमच्या या ग्रामीण भागातील मुलींची समस्या दूर करण्यासाठी रोटरी क्लबने केलेल्या मदतीबद्दल सर्व पालक व संस्थेच्यावतीने आभार मानतो. रोटरी क्लबने आमच्या संस्थेला ही केलेली मदत आमच्यासाठी सदैव प्रोत्साहनपर राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत सावंत यांनी मानले. (वार्ताहर)
उद्दिष्ट ५० टक्के पूर्णत्वास
डॉ. नंदिनी देशमुख यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वच्छतेचा भाग म्हणून
मुंबई रोटरीच्यावतीने ५०० स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
आमचे हे उद्दिष्ट ५० टक्के पूर्णत्वास आले असून, नांदगावचे हे स्वच्छतागृह त्याचाच एक भाग असून बांद्रा रोटरी क्लबच्यावतीने विशेषत: मुलींसाठी वस्तूंचे वाटप करण्यात आले.