मुलींच्या वसतिगृहात महिला कर्मचारी द्या
By admin | Published: February 3, 2015 10:36 PM2015-02-03T22:36:03+5:302015-02-03T23:54:30+5:30
पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार : वेंगुर्ले कॅम्प येथील वसतिगृहास सभापतींची भेट
वेंगुर्ले : वेंगुर्ले-कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वसतिगृहातील मुलींना शासनाच्या निर्देशानुसार ठरविलेला आहार दिला जात नाही. अस्वच्छ स्वयंपाकगृह आणि पाणी यामुळे मुलींच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो. तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी गृहपाल आणि आचारीपदी मात्र पुरुषांची नियुक्ती केली असल्याने त्वरित महिला अधिकारी व कामगारांची नियुक्ती करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे पंचायत समितीचे सभापती सुचिता वजराटकर यांनी सांगितले.
यावेळी वजराटकर व गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहास सोमवारी अचानक भेट दिली. त्यामुळे तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थिनींना स्वयंपाक गृहातून पुरविले जाणारे जेवणाची दैनंदिनी आहारासह फलकावर लिहिली जाते; परंतु २५ जानेवारी २०१५ पर्यंतची नोंद फलकावर असल्याचे सभापतींना आढळून आले.
प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक क्षमता असलेल्या या वसतिगृहात पन्नास मुलींनी प्रवेश घेतला आहे. वसतिगृहाचे अधीक्षक गृहपाल पी. जी. इंगळे यांच्याकडे मुलींच्या वसतिगृहांचा कार्यभार आहे. १६ आॅगस्ट २०१४ रोजी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात २२ सप्टेेंबर व १ नोव्हेंबर रोजी प्रसिध्दी करण्यात आली होती. या वसतिगृहाच्या कामकाजास आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, अद्यापपर्यंत समाज कल्याण विभागाने या वसतिगृहाचे डीडीओ अकाऊंट काढलेच नसल्याची माहिती या भेटीप्रसंगी उघड झाली. यासाठी १२ लाख रुपयांच्या अपेक्षित खर्चाचा अहवाल पुणे आयुक्त कार्यालयाकडे सादर करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. (वार्ताहर)
महिला वसतिगृहातील स्वयंपाकगृहात शिळे अन्न, स्वयंपाकगृहातील टाकाऊ वस्तू तेथेच टाकलेल्या अवस्थेत सभापतींना आढळून आल्या.
येथील मुली व मुलांच्या आरोग्य तपासणीबाबत अनियमितता, गृहपाल पदासाठी पूर्णवेळ अधिकारी नाही, प्रसाधनगृहाची फरशी व दरवाजे नादुरुस्त, मुलांच्या वसतिगृहात वीज कमी प्रमाणात अशा समस्या या भेटीदरम्यान आढळून आल्या.