कर्जमाफी ३0 लाख शेतकऱ्यांना द्या

By admin | Published: June 4, 2017 10:54 PM2017-06-04T22:54:02+5:302017-06-04T22:54:02+5:30

कर्जमाफी ३0 लाख शेतकऱ्यांना द्या

Give the loan waiver to 30 lakh farmers | कर्जमाफी ३0 लाख शेतकऱ्यांना द्या

कर्जमाफी ३0 लाख शेतकऱ्यांना द्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : चार वर्षांत राज्यात साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही चिंताजनक बाब असून, शेतकऱ्यांबाबत सहानुभूती दाखवून त्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. आज राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील ३0 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी व्यक्त केले.
एसएसपीएम संस्थेच्यावतीने पडवे येथे लवकरच सुरू होणाऱ्या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एसएसपीएम संस्थेच्या अध्यक्ष नीलम राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. कुलकर्णी, काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, आदी उपस्थित होते.
आमदार राणे पुढे म्हणाले, फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्याचा लाभ फार कमी शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी होणार नाहीत. सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न त्वरित सोडविणे आवश्यक आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या हितासाठी माझी शक्ती खर्च करीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
लाईफटाईम हॉस्पिटलबाबत बोलताना ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आता गोवा, कोल्हापूर व मुंबईला जावे लागणार नाही, तर मुंबई, कोल्हापूर व गोव्यापेक्षाही अत्याधुनिक सुविधा व आधुनिक यंत्रसामुग्री असलेले सुसज्ज हॉस्पिटल कुडाळ तालुक्यातील पडवे येथे आकारास येत आहे. ते १0 आॅगस्टपूर्वी रुग्णांच्या सेवेत असेल.
प्रथम हॉस्पिटल, नंतर मेडिकल कॉलेज
आमदार राणे पुढे म्हणाले, १0 आॅगस्टपूर्वी हॉस्पिटल सुरू करण्यात येईल व परवानगी मिळाल्यानंतर मेडिकल कॉलेज सुरू होईल. हे हॉस्पिटल ७२ एकर जागेत उभे राहणार असून मेडिकल कॉलेजच्या आवारात कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, डॉक्टरांसाठी बंगले, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची मोफत व्यवस्था, ६२ बेडचा अतिदक्षता विभाग, जर्मन कंपनीचे १२ आॅपरेशन थिएटर असून, १२३ डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठी असल्याची माहिती त्यांनी दिली.
परदेशातील रुग्ण येणार
जगातील काही देशांमध्ये मेडिकल सुविधा मिळत नाहीत. त्या देशातील व्यक्तींवर या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. ६५0 बेडचे हे हॉस्पिटल असून, या हॉस्पिटलमध्ये माफक दरात दर्जेदार सेवा मिळणार आहेत. शिवाय गरिबांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
टीकाकारांवर मोफत औषधोपचार
जे माझ्यावर टीका करतात त्यांच्यावर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. टीका करणाऱ्यांचा खर्च मीच करणार आहे, असेही ते म्हणाले. देशात जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत ते या हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहेत. २0 सर्जन काम करणार आहेत. ९ सुपर स्पेशालिस्ट असणार आहेत, असे सांगून राणे म्हणाले, टीकाकारांनी ५ टक्के तरी काम करून दाखवावे.
यावेळी डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी हॉस्पिटलमधील यंत्रसामुग्री व सुविधांबाबत माहिती दिली.

Web Title: Give the loan waiver to 30 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.