विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार द्या
By admin | Published: July 4, 2014 11:02 PM2014-07-04T23:02:44+5:302014-07-05T00:07:51+5:30
सावंतवाडी काँॅग्रेस तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी
सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघाच्या बाहेरून येणारा प्रत्येकजण इच्छुक असल्याचे सांगतो. मग सावंतवाडी मतदार संघातील कोणीच इच्छुक नाही का, असा प्रश्न करत या निवडणुकीत स्थानिक उमेदवारच हवा, अशी मागणी काँग्रेस नेते विकास सावंत व अॅड. दिलीप नार्वेकर यांनी केली.
सावंतवाडी मातृछाया मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, विकास सावंत, प्रकाश कवठणकर, गुरुनाथ पेडणेकर, संजू परब, सभापती प्रियांका गावडे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.
बाहेरुन येणाऱ्या उमेदवारांपेक्षा विधानसभेसाठी स्थानिकांनाही संधी मिळाली पाहिजे. या मतदारसंघासाठी काहीजण इच्छुक आहेत. परंतु बाहेरून येणाऱ्या उमेदवारांपेक्षा स्थानिकांनाच संधी मिळाली पाहिजे, असे अॅड. दिलीप नार्वेकर यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष बाळा गावडे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामास लागण्याची गरज आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्यासोबत काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विकास सावंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामध्ये जनसंपर्कात कमी पडलो आहोत. या अपयशामध्ये कोणतीही मोदी लाट वगैरे नाही. काँग्रेस पक्षातर्फे म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य माध्यमातूनही विकासात्मक कामे केली आहेत. परंतु आम्ही जनसंपर्कात कमी पडल्याने पराभव स्वीकारावा लागला. येत्या निवडणुकीचा प्रचार करून पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. जे काही गाव पातळीवरचे वाद असतील, ते वाद बाजूला ठेवून पुन्हा एकदा जोमाने काम करण्यात सुरुवात करण्याचे आवाहन केले. तसेच सावंतवाडी येथे काँग्रेस तालुका कार्यालयाची सुरुवातही आज शुक्रवारी करण्यात आली असून या कार्यालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विकास सावंत यांनी केले.
राणेच्या वकतव्यानंतर
एक गट लांबच
दोन दिवसापूर्वी युवा नेते नीतेश राणे यांनी काँग्रेसच्या सध्याच्या कामकाजावर वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी काही काँग्रेस नेत्यांची नावे ही घेतली होती. त्याचे पडसाद या बैठकीवर दिसून आले. या बैठकी पासून एक गट पूर्णत: अलिप्त राहिला होता. त्याची चर्चा बैठकस्थळी होती.
सावंताची कार्यालय
उद्घाटनाला हजेरी
सावंतवाडीत तालुका काँग्रेसच्या बैठकीला अनुपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी मात्र काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली. या कार्यालयाचे सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. काँगे्रसमध्ये जिल्ह्यात कोणतेही गटतट नसून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकसंघ राहील. तसेच ८ जुलैला बैठक होणार असून यावेळी नारायण राणे जो निर्णय घेतील, तो मान्य आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)