संधी द्या, कुडाळचा चेहरामोहरा बदलवू

By admin | Published: March 27, 2016 01:08 AM2016-03-27T01:08:44+5:302016-03-27T01:08:44+5:30

सुरेश प्रभू : भाजपच्या नगरपंचायत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

Give the opportunity, change the face of the Kudal | संधी द्या, कुडाळचा चेहरामोहरा बदलवू

संधी द्या, कुडाळचा चेहरामोहरा बदलवू

Next

कुडाळ : यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी देशाला, राज्याला मागे नेले आहे. आता देश, समाज घडविण्यासाठी मतदारांनी केंद्रात व राज्यात भाजपला साथ दिली आहे. आता कुडाळवासीयांना संधी मिळाली असून, त्यांनी नगरपंचायतीची सत्ता भाजपला दिली, तर आम्ही कुडाळचा चेहरामोहरा बदलवू, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ नगरपंचायतीसाठीच्या कुडाळ शहर भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी सायंकाळी व्यक्त केला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ता माधव भंडारी, कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, भाजप कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, भाजप जिल्हा प्रवक्ता काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, कुडाळ शहर अध्यक्ष अजय शिरसाट, जिल्हा सरचिटणीस संतोष शिरसाट, सर्फराज नाईक, नीलेश तेंडुलकर, बंड्या सावंत, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर तसेच भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री प्रभू म्हणाले की, देशाच्या इतिहासात कधी नाही एवढा निधी व अधिकार आमच्या सरकारने राज्याला व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. त्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम आमचे सरकार करीत आहे.
यावेळी माधव भंडारी यांनी भाजपच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तर प्रमोद जठार यांनी पुढचा खासदार हा भाजपचाच असेल व त्यासाठी आम्ही सुरुवातही केली आहे. तर मिठबांव येथील धर्माजी हडकर, प्रमोद वाडेकर व इन्सुली येथील विकास केरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)
लोकसभा लढविण्याचा मानस
कोकणातून विजयी होणे हा खूप मोठा आनंद आहे. कोकणी जनतेची सेवा करायची संधी पुढच्या निवडणुकीतही येथील जनतेने द्यावी, असे आवाहन केले. प्रभू यांनी असे वक्तव्य केल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून पुढील लोकसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस असल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे सांगत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Give the opportunity, change the face of the Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.