सिंधुदुर्गला ‘डोंगरी’चा दर्जा देणार

By admin | Published: May 14, 2015 10:22 PM2015-05-14T22:22:57+5:302015-05-14T23:58:41+5:30

दीपक सावंत : नेमणुका देऊनही हजर न झालेले १५० डॉक्टर्स बडतर्फ

Give the status of 'hillari' to Sindhudurg | सिंधुदुर्गला ‘डोंगरी’चा दर्जा देणार

सिंधुदुर्गला ‘डोंगरी’चा दर्जा देणार

Next

सावंतवाडी : सिंधुदुर्गमध्ये डॉक्टर येण्यास तयार नाहीत. यामागची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, सिंधुदुर्गला डोंगरी भागाचा दर्जा दिल्यास डॉक्टरांना अधिक पगार व सुविधा मिळतील. तसा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असे मत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मांडले. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नेमणुका देऊनही हजर न झालेल्या राज्यातील १५० डॉक्टरांना बडतर्फ केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे गोव्याहून देवगडला जात असताना काही काळ सावंतवाडीत थांबले होते. यावेळी त्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय वंदाळे यांनी स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, डॉ. उत्तम पाटील, नायब तहसीलदार शशिकांत जाधव उपस्थित होते.आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा डायलेसीस सेंटरने जोडायचा आहे. सद्यस्थितीत ओरोस व सावंतवाडी येथील रुग्णालयात डायलेसीस सेंटर आहेत. तर कणकवली व देवगड येथील डायलेसीस सेंटर प्रस्तावित असून, वैभववाडीला ही सुविधा दिली जाणार आहे. सिध्दिविनायक ट्रस्टकडून सरकारला अनुदान प्राप्त झाले असून, त्यातूनही या सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. सरुवातीच्या काळात डायलेसीस सेंटरमध्ये खासगी डॉक्टरांची नेमणूक केली असली,तरी भविष्यात कायमस्वरूपी डॉक्टरांची पदे भरल्यानंतर खासगी डॉक्टरांना कमी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण या जिल्ह्यात नेमणूक दिलेले डॉक्टर येत नाहीत. याची कारणे शोधण्याचे काम आम्ही करीत असून, राज्यस्तरावर २,१९८ डॉक्टरांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यातील ६५० डॉक्टरांना नेमणुकाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य सिंधुदुर्गला देण्यात आले आहे. मागील काही वर्षात नेमणुका देऊनही हजर न झालेल्या १५० डॉक्टरांना बडतर्फ करण्यात आल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)


आरोग्यमंत्री म्हणाले :
सिंधुदुर्गचा डॉक्टरांचा प्रश्न लवकरच सुटेल.
नेमणूक देऊन हजर न झालेले १५० डॉक्टर बडतर्फ.
आरोग्यमंत्र्यांची गोवा मेडिकल कॉलेजला भेट.


१५ वर्षांची पापे ६ महिन्यात कशी धुऊ ?
मागील सरकारने आरोग्य विभागाच्या बाबतीत जी पापे केली आहेत, ती अवघ्या ६ महिन्यात धुवून काढणे शक्य नाही. १५ वर्षांत अनेक चुकीची कामे झाली आहेत. ती सुधारून गाडी रूळावर आणेपर्यंत १ वर्ष जाणार आहे. त्यानंतर अनेक प्रश्न सुटलेले असतील, असा आशावादही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.



आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून गोव्याला जोडणार
सिंधुदुर्गातील रुग्णांना गोव्यात योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी मी स्वत: आज गोवा मेडिकल कॉलेजला भेट दिली आहे. राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ सिंधुदुर्गमधील रुग्णांना मिळावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली असून, १ जुलैला नवीन करार होणार आहे. त्यात गोव्याचा उल्लेख करण्यात येणार असून, येथील रुग्ण गोव्यातील मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन मोफत लाभ घेऊ शकतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण देणार
अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन सरकारी रुग्णालयाच्या शेजारीच वैद्यकीय शिक्षणाची महाविद्यालये उभी करण्याचा सरकारचा मानस आहे. याबाबतचा अहवाल मंत्रिमडळ बैठकीत ठेवण्यात येणार असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर डॉक्टरांबाबतचे सगळे प्रश्न लवकरात लवकर सुटतील, अशी अपेक्षा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Web Title: Give the status of 'hillari' to Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.