सिंधुदुर्गातील जनतेला टोलमुक्ती द्या!, टोल मुक्त समितीची मंत्री दीपक केसरकरांकडे मागणी

By सुधीर राणे | Published: January 21, 2023 05:15 PM2023-01-21T17:15:55+5:302023-01-21T17:16:29+5:30

तालुक्यातील नागरिकांना मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नाही

Give toll exemption to the people of Sindhudurga!, Toll exemption committee's demand to Minister Deepak Kesarkar | सिंधुदुर्गातील जनतेला टोलमुक्ती द्या!, टोल मुक्त समितीची मंत्री दीपक केसरकरांकडे मागणी

सिंधुदुर्गातील जनतेला टोलमुक्ती द्या!, टोल मुक्त समितीची मंत्री दीपक केसरकरांकडे मागणी

googlenewsNext

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ साठी ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोल आकारणी लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या नियोजित पथकर आकारणीतून सिंधुदुर्गवासीयांना मुक्ती मिळावी, अशी जिल्ह्यातील जनतेची भावना आहे. तसेच कणकवली गडनदी पुलानजीकचे धोकादायक वळणाबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीच्यावतीने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली. 

सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीच्या सदस्यांनी मंत्री केसरकर यांची कसाल येथील सिद्धिविनायक मंदिर येथे शुक्रवारी भेट घेतली. यावेळी द्वारकानाथ घुर्ये, संजय भोगटे, नितीन वाळके, राजन नाईक, नितीन म्हापणकर, अवधूत मालणकर, विनायक मेस्त्री आदी उपस्थित होते. 

मंत्री केसरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामार्ग  टोलमुक्त असेल, असे संबंधितांकडून यापूर्वी जाहीरही करण्यात आले होते. तरीही टोलच्या माध्यमातून महामार्ग  बांधणीचा खर्च वसूल करण्यास आमची कोणतीच हरकत नाही. मात्र, या सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची जागा आणि जिल्ह्याचा नकाशा लक्षात घेतला, तर जिल्ह्याच्या उत्तर भागातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यातील नागरिकांना मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नाही. साहजिकच त्यांना टोलच्या माध्यमातून भुर्दंड पडणार आहे. शासनानेच दिलेल्या शब्दानुसार जिल्हावासीयांना टोलमाफी मिळावी. सिंधुदुर्गचे सुपुत्र या नात्याने आपण टोलमाफीसाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, असेही म्हटले आहे.


यावेळी झालेल्या चर्चेत हळवल फाटा येथील धोकादायक वळणाबाबतही चर्चा करण्यात आली. त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. वरील प्रश्नांबाबत मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितल्याची माहिती नितीन म्हापणकर यांनी दिली.

Web Title: Give toll exemption to the people of Sindhudurga!, Toll exemption committee's demand to Minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.