सिंधुदुर्गचा दिल्लीत गौरव

By admin | Published: September 30, 2016 11:23 PM2016-09-30T23:23:57+5:302016-10-01T00:21:48+5:30

‘स्वच्छ जिल्हा’ पुरस्कार : संग्राम प्रभूगावकर, शेखर सिंह यांची उपस्थिती

Glory in Sindhudurg's Delhi | सिंधुदुर्गचा दिल्लीत गौरव

सिंधुदुर्गचा दिल्लीत गौरव

Next

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शुक्रवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला ‘देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा’ पुरस्कार बहाल करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल बागल उपस्थित होते.
मुळातच सिंधुदुर्ग जिल्हा संस्कारी जिल्हा असल्याने स्वच्छतेबाबतचे बीज प्रत्येक नागरिकाच्या अंगी रोवले गेले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, शाहू-फुले-आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियान, साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धा, राजमाता जिजाऊ, साने गुरुजी स्वच्छ अंगणवाडी पुुरस्कार, निर्मल ग्राम अभियान अशा प्रकारच्या अभियानांमध्ये सिंधुदुर्गने जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ असल्याचे अधोरेखित झाले होते.
या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री व्यंंकय्या नायडू यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)


सिंधुदुर्गला १०० पैकी ९६.८ टक्के गुण
देशात स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या ७५ जिल्ह्यांचा केंद्राच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या संस्थेमार्फत सर्व्हे केला होता. त्यामध्ये ५३ पठारी व २२ डोंगराळ जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने १०० पैकी ९६.८ टक्के गुण मिळवत स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावला होता.
पर्यटनवाढीसाठी फायदा होणार
सिंधुदुर्ग पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे. १०० टक्के साक्षर जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. त्यातच स्वच्छ जिल्हा अशी आणखी एक ओळख निर्माण झाल्याने याचा फायदा जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी होणार आहे.

नवी दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ‘देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा’ हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्वीकारला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते.

Web Title: Glory in Sindhudurg's Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.