पूर्वांचलकडे चला! परिस्थितीची दखल घ्या
By admin | Published: December 22, 2014 12:20 AM2014-12-22T00:20:01+5:302014-12-22T00:20:01+5:30
प्रतिभा आठवले : देवगडात बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला
देवगड : बांगलादेश, चीन व म्यानमार सदैव पूर्वांचलच्या नागरिकांना अशांत ठेवून हा भाग बळकावण्याच्या प्रयत्नात असतात. अशावेळी उर्वरित भारतीयांनी या भागाशी सातत्यपूर्ण व प्रभावी संपर्क ठेवून या भागाचा मुलभूत विकास केला तरच येथे काश्मिर किंवा पूर्वीच्या पंजाबसारखी स्थिती उत्पन्न होणार नाही. तेव्हा पूर्वांचलाकडे चला, असा संदेश अहमदाबाद येथील अभ्यासक प्रतिभा आठवले यांनी व्याख्यानात देवगडवासीयांना दिला.
पूर्वांचल हा निसर्गाने पूर्ण वरदहस्त ठेवलेला अतिरमणीय परंतु दुर्गम व निसर्गसंपन्न भूभाग आहे. भारतावर सूर्याची पहिली किरणे अरुणाचलमध्येच पडतात. हा भाग सात राज्यांचा आहे. परंतु सातही राज्यात शेकडो आदिवासी (जमाती) निवास करतात. त्यांची भाषा पूर्ण वेगळी आहे. त्यांच्यात संवाद नाही. त्यामुळे परकीय शक्ती या सर्वात फूट पाडून येथील प्रशासन खिळखिळे करत आहेत. त्याची दखल वेळीच घेतली नाही तर येथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. हे वेळीच रोखले पाहिजे, असा स्पष्ट इशारा डॉ. प्रतिभा आठवले यांनी दिला.
पूर्वांचलमधील मुख्य नदी ब्रह्मपुत्रा आहे. तिचा १६०० किलोमीटर प्रवास तिबेटमधून व भारतातून दक्षिणेकडे ९०० किलोमीटर प्रवास करून ही नदी बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते. तिचा प्रवाह अत्यंत अनियमित आहे. म्हणून येथे विकास हळूहळू होत आहे. ब्रह्मपुत्रा इतकी विशाल आहे की, तिचा विरूद्ध किनारा अनेक ठिकाणी नुसत्या नजरेला दिसत नाही. दोन्ही बाजूला उंच कडे व डोंगर आहेत. या भागात जलमार्ग किंवा मोटारीने प्रवास करावा लागतो, अशी माहिती त्यांनी दिली. रामायण-महाभारताचे उल्लेख त्यांनी या भागाविषयी करुन पौराणिक काळापासून आधुनिक युगापर्यंत या भागाचे संदर्भ मिळतात.
या भागाचे निसर्गवैभव वर्णन करताना त्यांनी सुमारे ३०० विविध आर्किडच्या प्रजाती, बांबू, चहा, खळ यांचे मळे यामुळे हा भाग निश्चितच वैभवसंपन्न आहे. मात्र, लिपीचा अभाव व प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर बदलणारी भाषा यामुळे या भागातील जनतेचा एकमेकांशी व उर्वरित भारताशी संपर्क नाही.
सांस्कृतिकरित्या या भागाच्या ट्राईब्ज एकलव्य, रुक्मिणी, गंधर्व-अप्सरांचे वंशज असल्याचे सांगतात. भगवान परशुरामांचा वास या भागात होता. या भागातील लोकांचे सांस्कृतिक जीवन, खाद्यसंस्कृती व करमणूक यासह भाषा व चालीरिती यांवरही आठवले यांनी विस्तृत भाष्य केले. सध्याच्या परिस्थितीत परकीय शक्तींच्या प्रयत्नांना विरोध करून या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी व त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी स्वत: आठवले या सात ते आठ ठिकाणी डेंटल क्लिनिक चालवून स्वखर्चाने त्यांची सेवा करीत असल्याचा खास उल्लेखही त्यांनी केला. (प्रतिनिधी)