गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेवरुन वाद निर्माण करु नये, अन्यथा..; मनसे नेते परशुराम उपरकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 03:41 PM2022-05-16T15:41:15+5:302022-05-16T15:41:51+5:30

कोकणी भाषेच्या प्रसारासाठी लहान बालकांना त्या भाषेतील साहित्य देण्याचा निर्णय गोव्यात झाला आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले हे चुकीचे.

Goa Chief Minister Pramod Sawant should not create controversy over language, MNS leader Parashuram Upkar warning | गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेवरुन वाद निर्माण करु नये, अन्यथा..; मनसे नेते परशुराम उपरकरांचा इशारा

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेवरुन वाद निर्माण करु नये, अन्यथा..; मनसे नेते परशुराम उपरकरांचा इशारा

Next

कणकवली : गोव्यात मराठी व कोकणी भाषा यावरून सध्या वाद सुरू आहे. त्यातच  गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणीच्या वादाची ठिणगी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी कोकणी, मराठी व मालवणी भाषेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा मनसेला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

मालवण येथील कोकणी भाषा परिषदेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली. जरी कोकणी ही एक भाषा असली तरी आमची बोली भाषा ही मालवणी असल्याचे ते म्हणाले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

परशुराम उपरकर पुढे म्हणाले, कोकणी भाषेच्या प्रसारासाठी लहान बालकांना त्या भाषेतील साहित्य देण्याचा निर्णय गोव्यात झाला आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले हे चुकीचे आहे. त्या कोकणी भाषा परिषदेला सिंधुदुर्गातील स्थानिक आमदारांनी उपस्थित राहून पाठींबा देणे हेही चुकीचेच असल्याचा आरोप उपरकर यांनी यावेळी केला.

मालवणी भाषेत भाषण करणारा एकमेव आमदार

आमची मराठी भाषा असली तरी आमची मालवणी ही बोली भाषा आहे. आता  मालवणी माणूस कुठेही गेला तरी मालवणीच बोलू लागला आहे. मी आमदार असताना महाराष्ट्र विधानपरिषदेत अर्थसंकल्पाच्या वेळी मालवणी भाषेत भाषण करणारा एकमेव आमदार होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात मराठी, कोकणी, मालवणी वाद निर्माण करु नये

गोव्याच्या  मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गात कोकणी परिषदेच्या निमित्ताने आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी गोव्यापुरताच कोकणी भाषेचा प्रसार मर्यादित ठेवावा. महाराष्ट्र राज्यात मराठी, कोकणी, मालवणी असे वाद निर्माण करु नये. त्यांचा उद्देश लक्षात आल्यानेच या कोकणी भाषा परिषदेकडे तरुणांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील तरुणांनी कोकणी भाषेचा चुकीचा प्रसार करण्याऱ्या लोकांना रोखण्याचे काम केले पाहीजे.

कोकण चित्रपट महोत्सवात का सहभागी झाले नाहीत?

सिंधुदुर्गात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री कोकण चित्रपट महोत्सवात का सहभागी झाले नाहीत? पक्षीय पातळीवरून गोव्याची कोकणी भाषा महाराष्ट्र राज्यात आणण्याची गरज नाही. तसे झाल्यास मराठी व मालवणी भाषेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही तीव्र आंदोलन करेल. असेही उपरकर म्हणाले.

Web Title: Goa Chief Minister Pramod Sawant should not create controversy over language, MNS leader Parashuram Upkar warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.