करूळ नाक्यावर 12 लाखांची गोवा बनावटीची दारू पकडली, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 05:19 PM2023-03-10T17:19:33+5:302023-03-10T17:19:56+5:30
आरामबसमध्ये स्वतंत्र जागा निर्माण करून दारूची वाहतूक
वैभववाडी : गोवा बनावटीची १२ लाख रुपये किमतीची दारू घेऊन धाराशिवला जाणाऱ्या ट्रकवर करूळ तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकमधील दोघांना अटक केली असून, दारूसह २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस हवालदार नितीन खाडे यांनी बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता केली.
करूळ तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एमएच १२ एचडी २६४४) आला. तेथे कर्तव्य बजावणारे पोलिस हवालदार खाडे यांनी हा ट्रक थांबविला. ट्रकचालक अमीर गुलाब तांबोळी आणि त्याचा सहकारी रोहित रोहिदास समदडे (रा. पाटोदा, ता. उस्मानाबाद) या दोघांकडे ट्रकमध्ये काय साहित्य आहे, याची विचारणा केली.
तेवढ्यावरच न थांबता खाडे यांनी ट्रकमध्ये चढून पाहणी केली. तेव्हा तेलाचे डबे त्यांना दिसून आले. त्यांनी तेलाचे डबे तपासले असता आतील बाजुला गोवा बनावटीची दारू लपविल्याचे आढळून आले. ही माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक अमित यादव यांना दिली.
त्यानंतर आणखी काही कर्मचारी करूळ तपासणी नाक्यावर पोहोचले. त्यांनी दारू असलेला ट्रक वैभववाडी पोलिस स्थानकात आणला. त्यानंतर ट्रकमध्ये असलेल्या दारूची मोजदाद करण्यात आली. ट्रकमध्ये गोवा बनावटीची १२ लाख रुपये किमतीची दारू असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी ट्रकसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अमीर तांबोळी आणि रोहित समदडे या दोघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार मारुती साखरे करीत आहेत.
दारू वाहतुकीची चर्चा
गोवा बनावटीच्या दारूची ट्रक, टेम्पो, आराम बसमधून नियमित वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. आरामबसमध्ये स्वतंत्र जागा निर्माण करून दारूची वाहतूक केली जाते. गाडीत असलेल्या प्रवाशांचा रोष ओढवू नये म्हणून पोलिस या गाड्यांची तपासणी करीत नसल्याची चर्चा आहे.