गोव्यातील युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 05:41 PM2019-12-27T17:41:34+5:302019-12-27T17:42:18+5:30
उभादांडा-बागायत समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला म्हापसा-गोवा येथील अब्दुल रजाक डुडंशी (२९) याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
वेंगुर्ला : उभादांडा-बागायत समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला म्हापसा-गोवा येथील अब्दुल रजाक डुडंशी (२९) याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
म्हापसा येथील अब्दुल हा गाईडचे काम करीत होता. गुरुवारी सकाळी गोवा येथून एका विदेशी (रशियन) पर्यटकाला घेऊन वेंगुर्ला येथे तो आला होता. वेंगुर्ला फिरत असताना त्याने समुद्राची सफर करण्यासाठी सोबत आणलेल्या विदेशी पर्यटकाला समुद्र स्नानासाठी उभादांडा-बागायत समुद्रकिनारी आणले. तेथील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर दोघेही समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले.
मात्र, अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेचा अंदाज न आल्याने अब्दुल याचे पाय वर उचलले गेले व तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात बुडाला. काही वेळानंतर त्याचा मृतदेह समुद्रकिनारी दिसून आला.
याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेंगुर्ला पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव करीत आहेत. या घटनेसंदर्भात रशियन महिला पर्यटक स्वेतलाना यांनी वेंगुर्ला पोलिसांत माहिती दिली.