देव दगडात नाही, माणसात शोधा!

By admin | Published: February 8, 2016 08:35 PM2016-02-08T20:35:21+5:302016-02-08T23:44:50+5:30

नाना पाटेकर : आचरा न्यू इंग्लिश स्कूलचा शतक महोत्सव सोहळा

God does not find a stone, find among the people! | देव दगडात नाही, माणसात शोधा!

देव दगडात नाही, माणसात शोधा!

Next

मालवण : देशात मध्यंतरी असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भारतीय असल्याचा प्रत्येकाच्या मनात अभिमान असला तर असहिष्णुतेचे वातावरण तयार होणार नाही. हिंदू-मुस्लिम यांच्यात देवाच्या नावावर धार्मिक वाद निर्माण केला जातो. मात्र, दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात शोधा. माणसांवर प्रेम करणे म्हणजे भक्ती आणि समाजसेवा करणे ही मोठी पूजा आहे, अशा शब्दांत ‘नाम’ फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचा मूलमंत्र दिला.
आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित आचरा न्यू इंग्लिश स्कूलचा शतक महोत्सव सोहळा ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात आला. शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त नाना पाटेकर यांची उपस्थिती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होती. यावेळी संस्थेच्यावतीने 'नानां'चा अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्था कार्याध्यक्ष प्रदीप परब, प्रभाकर मिराशी, विजय गोखले, संजय मिराशी, अशोक पाडावे, मुख्याध्यापक बाजेल फर्नांडिस, इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक मायलीन फर्नांडिस, शतक महोत्सव समिती अध्यक्ष अशोक गावकर, कॉलेज प्राचार्य सिद्धेश्वर करंबळेकर, माजी सरपंच शशांक मिराशी, मंदार सांबारी, शेखर सावकार, डॉ. रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागतचा कार्यक्रम झाल्यावर नानांनी व्यासपीठावरील मान्यवरांना खाली जाऊन बसण्याच्या सूचना करत स्वत:ही खाली बसून विद्यार्थ्यांशी दिलखुलास हितगूज केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविधांगी प्रश्नांना नानांनी उत्तरे देत अनेक अनुभव कथनातून विद्यार्थ्यांना सुज्ञ नागरिक बनण्याचे 'प्रेरणात्मक' बाळकडूही पाजले. नाना यांनी स्वातंत्र्यापासून ते सोशल मीडियाचे दुष्परिणाम आणि लोकशाही ते अभिनय, भूतदया, माणुसकी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर नानांनी 'माणुसकी'च्या पुस्तकातील एक एक पान उलगडले हे विशेष!! कार्यक्रमाच्या शेवटी नानांनी बच्चेकंपनीशी संवाद साधत फोटोसेशन केले. तसेच 'सेल्फी'च्या नादाला लागू नका, असे सांगत सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा, असा सल्लाही दिला. (प्रतिनिधी)


‘नाम’ ही उशिरा सुचलेलं शहाणपण
लोकांच्या विश्वासावर ‘नाम’ची स्थापना झाली. शेतकरी बांधवांसाठी जनतेने मदतीचा हात म्हणून २३ कोटींची मदत केली आहे. यात लोकांचा विश्वास आहे, मी आणि मकरंद अनासपुरे बुजगावणं आहोत, असेही पाटेकर यांनी सांगितले. पाणी समस्येवर मात करण्यासाठी ३०० कि.मी. नद्यांची खोली रुंदीकरण करून पाणीप्रश्न सोडविण्याचे प्रयत्न राहणार आहेत, तर येथील भागात ठिबक सिंचन, शाळा बांधणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत यासारखे उपक्रम ‘नाम’तर्फे घेण्यात येत आहेत. यावेळी नानांनी ‘नाम’ची निर्मिती करणे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. मकरंद नसता तर नामची स्थापना झाली नसती. आमच्या छोट्याशा उपक्रमामुळे मराठवाड्यात आत्महत्या कमी होतील, असा माझा विश्वास आहे, असे पाटेकर यांनी सांगितले.



कोकणात लवकरच ‘नाम’
आज निसर्गाचा कोप झाला आहे. विदर्भ-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, कोकणातील माणूस आहे त्यात समाधानी आहे. कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. कोकणात आंबा, काजू बागायतदार व मच्छिमारांच्या समस्या असल्याने लवकरच कोकणात नाम फाउंडेशनची शाखा उभी केली जाईल, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.


स्मार्ट युगात माणसे वाचायला शिका
आज वाचन संस्कृती नष्ट होत आहे. वाचन हे माणसाला घडवते. आजच्या स्मार्ट युगात विद्यार्थ्यांनी पुस्तकी वाचन करण्यापेक्षा माणसे वाचायला शिका. त्यातून नवा आदर्श घ्या, प्रेरणा घ्या, असे सांगत विद्यार्थ्यांनी ध्येयावर विश्वास ठेवून यशस्वी व्हा. आदर्श नागरिक घडताना सामाजिकता जोपासा. एखाद्या जखमीच्या जखमेवर फुंकर मारताना आपल्या जखमेचा विसर पाडला पाहिजे, इतकी माणुसकी ठासून भरली पाहिजे, असे नाना म्हणाले.

Web Title: God does not find a stone, find among the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.