लाठीचार्जविरुद्ध न्यायालयात जाणार
By admin | Published: March 6, 2016 10:46 PM2016-03-06T22:46:49+5:302016-03-07T00:40:47+5:30
नारायण राणे : ‘कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्यास थेट मला फोन करा’
कुडाळ : गौण खनिज व्यावसायिक वाहतूकदार यांच्याकडे पोलीस किंवा महसूल विभागातील कोणीही कर्मचाऱ्याने पैशाची मागणी केल्यास त्याची माहिती मला फोनवरून द्या असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत करून येथे सुरु असलेल्या डंपर चालक-मालक आंदोलनाची भूमिका सोमवारी जाहीर करणार असून लाठीचार्ज ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने झाला त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.
हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे गौण खनिज व्यावसायिक व डंपरचालक-मालक संघटना व्यावसायिक यांचा मेळावा घेतला व या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शासनाच्या कार्यप्रणालीवर व सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर जाहीर टीका केली.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, येथे सुरु असलेले आंदोलन हे जिल्ह्यातील प्रशासनाने व जिल्हाधिकारी यांनी स्वत:च्या जाचक अटी घालून येथील गौण खनिज व्यावसायिकांना अडचणीत आणले आहे. येथील पोलीसच ४ ते ५ ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून पैसे घेतात. हे चुकीचे आहे.
येथील आंदोलकांनी दगड घेऊन काचा फोडल्या नाहीत तर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संगनमताने लाठीचार्ज केला व या पोलिसांच्या लाठीचार्जात मोठ्या प्रमाणात काचा फोडण्यात आल्या, असेही राणे यांनी सांगितले.
तसेच लोकप्रतिनिधी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी भेट घेणे गरजेचे असते. मात्र, ते केबिनला लॉक करून केबिनमध्ये बसले होते. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचे सांगितले आहे. हे कितपत योग्य आहे हे समजत नाही व ते चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे : राणे
गौण खनिज वाहतुकीच्या प्रश्नाबाबत मी स्वत: मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांशी बोललो असून त्यांनी याबाबत तोडगा काढल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शासन आदेशात आवश्यक बदल करण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदारांनी पळ काढला : राणे
लाठीचार्जनंतर येथील सत्ताधारी आमदार व माजी आमदार यांनी पळ काढला व मुख्यमंत्र्यांकडे जावून फक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबतही राणे यांनी खिल्ली उडविली.
हे सरकार फसवे आहे
येथील पालकमंत्री पळपुटा आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना वास्तव काय आहे ते माहिती नाही तसेच हे सरकार फसवे असून सर्वसामान्यांसाठी व कोकणी माणसांसाठी नाही. बेबंदशाहीचे सरकार आहे असेही ते म्हणाले.
सोमवारपासून येथील सुरु असलेले दारुधंदे, जुगार व्यवसाय बाहेर काढून तेथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पाप असा बॅनर लावणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, व्हिक्टर डान्टस, सुरेश दळवी, संदीप कुडतरकर, रणजित देसाई, अबीद नाईक, अशोक सावंत आदी उपस्थित होते.