देवगडवासीयांसाठी गुड न्यूज, देवगड आनंदवाडी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी : प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:15 PM2017-12-13T15:15:19+5:302017-12-13T15:20:22+5:30
गेले अनेक दिवस मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. आनंदवाडी येथील बंदर प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर गेली अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे देवगडवासीयांसाठी ही गुड न्यूज असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
देवगड : गेले अनेक दिवस मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. आनंदवाडी येथील बंदर प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर गेली अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे देवगडवासीयांसाठी ही गुड न्यूज असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
याबाबत माहिती प्रथम येथील स्थानिकांचा विरोध लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे प्रकल्प लोकवस्तीपासून ५०० मीटर पुढे सरकविण्यात आला होता.त्यानंतर अनेक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले गेले होते. मात्र माजी आमदार प्रमोद जठार यांनी हा प्रकल्प होण्यासाठी सतत पाठपुरावा चालू ठेवला. त्यासाठी अनेकवेळा दिल्ली वारी देखील केली. या कालावधीत प्रकल्पाची किंमत वाढून ती ८८.४ कोटींपर्यंत पोहोचली.
सुरुवातीला केंद्र शासनाचा निधी ७५ टक्के आणि राज्याचा निधी २५ टक्के असे ठरले होते.त्यानंतर त्यामध्ये बदल होऊन केंद्र शासनाकडून ५० टक्के व राज्य शासनाकडून ५० टक्के असे ठरले. मात्र, त्यानंतर यामध्ये बदल होउन केंद्र शासन २५ कोटी रुपये आणि प्रकल्पाची उर्वरित रक्कम ६३.४ राज्य शासनाने द्यावेत असे ठरले.
सदर ६३.४ कोटी च्या मंजुरीचे पत्र राज्य शासनाने केंद्राला देणे गरजेचे होते. याबाबत जठार यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ६३.४ कोटी रुपये मंजूर करुन मागील बजेटमध्ये १० कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. मात्र, केंद्राच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत हा प्रकल्प होता.
केंद्राच्या या २५ कोटीपैकी पन्नास टक्के म्हणजे साडेबारा कोटी रुपये अॅग्रीकल्चर डिपार्टमेंटक डून तर उर्वरित साडेबारा कोटी रुपये सागरमाला मधून मंजुरीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी अॅग्रीकल्चरकडून मिळणारे साडेबारा कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झाले होते. त्यानंतर साडेबारा कोटी रुपये सागरमालामधून मंजूर होण्यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन मंजुरीसाठी प्रयत्न केला होता.
तपश्चर्येला फळ मिळाले
गडकरी यांनीही याबाबत लक्ष घालून सागरमालामधून साडेबारा कोटी निधीला मंजुरी दिली आहे. त्याबाबतच्या मंजुरीचे पत्र घेण्यासाठी प्रमोद जठार यांना दिल्ली येथे बोलावून मंजुरीचे पत्र त्यांचेकडे सूपूर्द केले आहे. त्यामुळे आनंदवाडी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला असून येथील स्थानिक ग्रामस्थ आणि प्रमोद जठार यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येला फळ मिळाले आहे.