सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, खरेदीची रक्कम अन् बोनस मिळणार
By सुधीर राणे | Published: March 31, 2023 04:58 PM2023-03-31T16:58:02+5:302023-03-31T16:58:30+5:30
५ हजार ६२१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाने १ लाख ६२२ क्विंटल भात खरेदी केली होती. भात खरेदीची रक्कम आणि बोनस संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. ही रक्कम २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी काळसेकर म्हणाले, गेल्या काही वर्षंपासून शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीची ई- पीक पाहणी करत भात खरेदी केंद्रांवर नोंद केली आहे. त्या शेतकऱ्यांना बोनस स्वरुपात ५ कोटी ७३ लाख २० हजार ६१० रुपये आणि भात विक्रीचे २० कोटी ५२ लाख ६९ हजार ३९० रुपये असे एकूण २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये प्राप्त होणार आहेत. ५ हजार ६२१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास जिल्हा बँक अध्यक्ष अथवा आपल्याला संपर्क साधावा.
यापूर्वीच्या काळात भात खरेदी दर अत्यल्प होता. व्यापारी कवडीमोल दराने भात खरेदी करीत होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १७ रुपये दराने भात खरेदी करत बोनस देतो असे सांगितले होते. मात्र,त्यांना तो देता आलेला नाही. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले नाहीत असा टोलाही अतुल काळसेकर यांनी यावेळी लगावला.
भात उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस स्वरूपात मिळणार आहेत. तर सध्याच्या शिंदे-फडणवीस युती सरकारने निधीची विशेष तरतूद अर्थसंकल्पात केल्याने काजू बागायतदारांना दिलासा मिळणार आहे. जीआय मानांकन करण्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे. येत्या काळात काजू बोंडू पासून इथेलॉन निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल. काजूला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितले.