तरूणांना देशसेवेची उत्तम संधी

By admin | Published: October 5, 2015 10:01 PM2015-10-05T22:01:58+5:302015-10-06T00:28:59+5:30

गृहरक्षक दलाबाबत शासनाची भुमिका सकारात्मक हवी : महेश घोसाळकर

Good opportunities for young people to serve the country | तरूणांना देशसेवेची उत्तम संधी

तरूणांना देशसेवेची उत्तम संधी

Next

रत्नागिरी जिल्हा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक महेश घोसाळकर यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी झालेली आहे. ही मुदत येत्या ८ आॅक्टोबरला संपत आहे. खरंतर जिल्हा समादेशकांना कोणतेही मानधन नाही. खऱ्या अर्थाने हे अधिकारी निष्काम सेवा बजावत असतात. तरीही घोसाळकर यांनी एक वर्षाची शासनाकडे मुदतवाढ मागितली आहे. ती मिळाली तर एक वर्ष आणखी देशसेवा करण्याची संधी मिळेल. नाही मिळाली तरीही गृहरक्षक दलाची बाहेरून सेवा करू, अशी इच्छा घोसाळकर व्यक्त करतात. देशाच्या प्रगतीसाठी गृहरक्षक दलाची आवश्यकता आहे. त्यासाठी शासन सकारात्मक व्हायला हवे. सरकारने या दलाचे आधुनिकीकरण आणि पुनर्रचना करण्यासाठी उच्चस्तरीय कमिटी नेमावी. त्यामध्ये विनामोबदला काम करण्याची आपली तयारी असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.
गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्यभावनेने काम करताना संरक्षणाबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचेही रक्षण करण्यासाठी धावून जात आहेत. सामाजिक शांतता, सलोखा राखण्यासाठी पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून ते काम करीत आहेत. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत नागरिकांच्या मदतीला धावून जात आहेत, ही खऱ्या अर्थाने देशसेवा आहे. या दलाच्या कार्याची माहिती जिल्हा समादेशक महेश घोसाळकर यांनी ‘लोकमत’च्या संवादमधून दिली.
प्रश्न : गृहरक्षक दलाची निर्मिती कधी झाली? त्यामागचा उद्देश काय?
उत्तर :या दलाचा इतिहास मोठा आहे. १९५० साली मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्रात गृहरक्षक दलाची स्थापना केली. सुरुवातीला शरद पवार, वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील अशी मोेठी माणसं गृहरक्षक दलात होती. तसेच डॉक्टर, वकील, व्यापारी यांच्यासह इतर नागरिकांचाही समावेश होता. नंतर ती पूर्ण देशात स्थापन झाली. गृहरक्षकाचे कर्तव्य म्हणजे निष्काम सेवा आहे. त्यामागचा उद्देश हा होता की, देशात ज्या ज्या वेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळी सर्व शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण असलेल्या गृहरक्षकाने त्या ठिकाणी धावून जावे. विशेष म्हणजे सुरुवातीला महिला गृहरक्षक दलही कार्यरत होते.
प्रश्न : गृहरक्षक दलाची आवश्यकता का आहे?
उत्तर : आजच्या तरूणांमध्ये शिस्त आणि कर्तव्याची उणीव जाणवते. समाजात वावरताना आपले वागणे, बोलणे, कसे असावे, शिस्त कशी असावी, याचे प्रशिक्षण होमगार्डमध्ये दिले जाते. सैनिकी शिस्तीची आज गरज आहे. त्याकरिता गृहरक्षक दल सक्षम होणे गरजेचे आहे. आज अनेक शाळांमधून एनसीसी परेड गायब झाल्या आहेत.
प्रश्न : गृहरक्षक दलात कोणाला दाखल होता येते ?
उत्तर : १८ वर्षांवरील कुणाही नागरिकाला, स्त्री - पुरूषाला यात सहभागी होता येते. आज अनेक शाळांमधून एनसीसी परेड गायब झालेत. सध्या देशप्रेम बेगडी झालेय. सुभाषचंद्र बोस यांचा जयहिंदचा नारा राहिलाच नाही. देशातील तरूणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषवाक्याप्रमाणे वाटचाल केली तर भारत नक्कीच भ्रष्टाचारमुक्त होईल. पत्रकारही यात दाखल झाले तर नक्कीच चांगल्या प्रतीची देशसेवा होईल. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पदवीधर यांना मानसेवी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी आहे.
प्रश्न : आपण या क्षेत्राकडे कसे वळलात?
उत्तर :खाकी वर्दीची आवड होती. १९९७ साली मी साधा होमगार्ड म्हणून या दलात दाखल झालो. त्यानंतर मंडणगड तालुका समादेशक झालो. ही सेवा देताना अतिशय प्रामाणिकपणे काम केल्याने २०१० साली जिल्हा समादेशक झालो. मी येण्यापूर्वी गृहरक्षक दल म्हणजे काय, हे कुणालाच माहीत नव्हते.
प्रश्न : गृहरक्षक दलासाठी आपण काय प्रयत्न केले?
उत्तर : जिल्हा समादेशकाची राज्यपालांकडून नियुक्ती होत असते. माझी या पदावर नियुक्ती झाल्यानंतर या दलाबाबत आधीच काही संकल्पना होत्या. त्या सत्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आधीच दलात काही बदल करण्याची गरज होती. त्यासाठी अनेक कसोट्यांतून जावे लागले. गृहरक्षकाला तू पोलीस शिपाई नव्हे; तर गृहरक्षक जवान आहेस, हे पटवून द्यावे लागले. येथील गृहरक्षक दलात असलेली मरगळ दूर करणे गरजेचे होते. त्यासाठी वाईटपणाही घेतला. पण यातून त्यांना शिस्त लागली. गेली सहा वर्षे जिल्हा समादेशक म्हणून काम करत असताना होमगार्डशी थेट संपर्क राहिला, शिस्त लावताना त्यांच्या समस्याही सोडवण्याचा प्रयत्न केला. संघर्षातून परिवर्तन झाले, ही बाब समाधानाची आहे. आता माझा होमगार्ड १०० टक्के अपडेट आहे.
प्रश्न : या कालावधीत कोणकोणते उपक्रम राबविले.
उत्तर : गृहरक्षक दलाच्या जवानांसाठी योगशिबिरे आयोजित केली आहेत. विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण राबवल्याने त्याचा लाभ घेऊन अनेकांनी स्वत:चे व्यवसायही सुरू केले आहेत. व्यसनमुक्ती रॅली, रक्तदान शिबिर आदी उपक्रम आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सातत्याने भरती प्रक्रियाही राबवली आहे. पोलीस दलात गृहरक्षकांना संधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
प्रश्न : गृहरक्षक दलाकडे येणाऱ्यांचा ओढा कमी आहे, याचे कारण काय?
उत्तर :मी मघाशीच म्हटलं तसं ही निष्काम सेवा आहे. शासनाचे धोरण उदासीन आहे. त्यामुळे होमगार्डंना कुठलेही मानधन नाही. त्यांना विमा नाही. गणवेशही पूर्णपणे देत नाही. कर्तव्यावर असताना २४ तासांचा फक्त ४०० रुपये कर्तव्यभत्ता दिला जातो. तसेच महिन्यातून एक परेड असते, त्याचे ९० रुपये शासनाकडून मिळतात. यामुळे होमगार्ड म्हणून दाखल होण्यास युवावर्ग नाखूश असतो. वास्तविक जेव्हाजेव्हा देशावर संकट आले तेव्हा गृहरक्षक दलाने अंतर्गत देश सांभाळला आहे. त्यामुळे मध्यंतरी राज्य शासनाने अधिक लक्ष देऊन या दलाचे आधुनिकीकरण केले व पोलिसांसोबत काम दिले. आताही अनेक ठिकाणी एक पोलीस, एक गृहरक्षक अशी संकल्पना शासनाने राबवली तर ती फायद्याची ठरेल.
प्रश्न : गृहरक्षक दल उपेक्षित का ठरत आहे?
उत्तर : आता गृहरक्षक दलातही राजकारण आले आहे. ज्यांना राजकारणात बडे पद मिळत नाही, अशांना गृहरक्षक दलाचे ज्ञान नसतानाही जिल्हा समादेशकासारखी जबाबदारी दिली जाते. या दलाबाबत प्रबोधन होत नाही. त्यामुळे युवावर्ग या दलाकडे कसा वळणार? यासाठी शासनाची उदासीनतीही तेवढीच कारणीभूत आहे. गृहरक्षक दलाला महासमादेशक व उपमहासमादेशक म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी देतात. बहुतेक वेळा ते भ्रष्टाचारी व शासनाला मदत न करणारे अधिकारी होमगार्डकडे पाठवतात. त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. साहजिकच त्यांचे गृहरक्षक दलाकडे दुर्लक्ष होते. शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे हे अधिकारी लक्ष्य देत नाहीत, त्यामुळे गृहरक्षक दलाचे नुकसान होते.
प्रश्न : गृहरक्षक दलाच्या उपयुक्ततेसाठी कोणती धोरणे राबविणे गरजेचे आहे.
उत्तर : सध्या पोलिसांची संख्या कमी म्हणून ओरड केली जाते. पण गृहरक्षक दल हे पोलिसांइतक्याच सक्षमेतेने काम करू शकते. त्याचा उपयोग सरकारने करायला हवा. यासाठी तरूणांचा ओढा गृहरक्षक दलाकडे वळावा, असे वाटत असेल तर या जवानांना कर्तव्यभत्ता किमान ८०० रुपये करणे गरजेचे आहे. गावचा पोलीसपाटील, पोलीस स्टेशनला समन्स बजावणे, सर्व शासकीय कार्यालयात असणारे सुरक्षारक्षक, रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून गृहरक्षक दलातील जवानांना संधी मिळायला हवी. दुर्दैवाने इतर घटनांमध्ये गेल्या ६० वर्षांत बदल झाले, पण गृहरक्षक दलाच्या घटनेत बदल करण्याचे धाडस आतापर्यंत कुणीही केलेले नाही.
प्रश्न : काय संदेश देऊ इच्छिता?
उत्तर : विदर्भ, मराठवाडा येथे गृहरक्षक दलात भरतीसाठी रांगा लागतात. त्या तुलनेने कोकणात ओढा कमी आहे. मुळात या दलात नोकरी करणारे, खासगी व्यवसाय करणारे कुणीही सहभागी होऊ शकतात. या पदाला मानसन्मान आहे. पोलीस, मिलीटरी भरतीतही १० टक्के आरक्षण आहे. अधिकाधिक तरूणांनी या दलात येणे गरजेचे आहे. शासनानेही या दलाची गरज लक्षात घेऊन त्याला आधुनिक बनवले तर राज्याचा खूप फायदा होईल. गृहरक्षक दलाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. तर खऱ्या अर्थाने देश महासत्ताक बनेल.
- शोभना कांबळे

Web Title: Good opportunities for young people to serve the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.