‘मगांरोहयो’ च्या कामांना चांगला प्रतिसाद
By admin | Published: May 13, 2016 11:46 PM2016-05-13T23:46:03+5:302016-05-13T23:46:03+5:30
साडेपंधरा कोटी रूपये खर्च : येत्या वर्षात साडेवीस कोटींचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सिंंधुदुर्गात १५ कोटी ३८ लाख रूपये विविध कामावर खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या १५ कोटी ३८ लाख रूपयांमधील ११ कोटी ४ लाख एवढी रक्कम मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आली आहे. यावर्षीच्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला शासनाने २० कोटी ६० लाखांचे रोजगार उद्दीष्ट रोजगार हमी योजनेअंतर्गत निश्चित करून देण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित झाल्यानंतर या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी शासनाने ठरवून दिलेले उद्दीष्ट येथील प्रशासन १२० टक्के पूर्ण करत आहे. गतवर्षी सिंधुदुर्गाला रोजगार हमी योजनेअंतर्गत ९ कोटी ५५ लाख रूपये व २ लाख ८८ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दीष्ट देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने येथील प्रशासनाने हे उद्दीष्ट तब्बल १९२ टक्के पूर्ण केले आहे. उद्दीष्टपूर्ती करताना १५ कोटी ३८ लाख कोटींची कामे व ४ लाख १७ हजार मनुष्य दिन भरले गेले आहेत. त्यात १२ कोटी ९८ लाखांची जिल्हापरीषद प्रशासनाने व २ कोटी ४७ लाख रूपये इतर यंत्रणांनी कामे केलेली आहेत, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
रोहयोच्या कामात जिल्हा परिषद अव्वल
४महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला तर जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेअंतर्गत १२ कोटी ९८ लाखाची कामे केलेली आहेत. तर इतर यंत्रणांनी २ कोटी ४५ लाखांची कामे केली. यावरून जिल्हा परिषद इतर यंत्रणेच्या तुलनेत रोजगार हमी योजनेच्या कामात अव्वल राहीली आहे.
मजुरीपोटी मिळाले ११ कोटी
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक मजूराला १८१ रूपये प्रतिदिन मजुरी दिली जाते. त्यात १० रूपयांनी वाढ करत ती १९१ रूपये करण्यात आली आहे. जिल्ह्यात १५ कोटी ३८ लाख एवढी रक्कम या योजनेवर खर्च करण्यात आली असून त्यापैकी मजुरीवर ११ कोटी ४ लाख तर उर्वरीत ३ कोटी ९८ लाख रूपये साहित्यावर खर्च करण्यात आले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील लाखो तरूणांना हाताला काम मिळत आहे.
या वर्षी २० कोटी ६० लाखांचे उद्दीष्ट
शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला रोजगार हमी योजनेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात २० कोटी ६० लाखांचे उद्दीष्ट दिले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात रस्ते, फळपिक योजना, सिंचन, विहिर, गांडूळखत, गोठ्यांचे बांधकाम, कुक्कुुटपालन आदी कामे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.