गुंडांची ओळख माझ्यापेक्षा राणेंना जास्त, दीपक केसरकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 04:48 PM2019-04-24T16:48:01+5:302019-04-24T16:49:41+5:30
मी राज्यमंत्री असताना राणेंवर गुन्हा दाखल करू शकलो नाही, याची आठवण करून दिल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. आता मी माझी नक्कीच यंत्रणा वापरेन. माझ्यावर आरोप करता, पण गुंडांची ओळख मला कशी असणार? माझ्यापेक्षा ती जास्त राणेंना असणार, अशी टीका सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद केली.
सावंतवाडी : मी राज्यमंत्री असताना राणेंवर गुन्हा दाखल करू शकलो नाही, याची आठवण करून दिल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. आता मी माझी नक्कीच यंत्रणा वापरेन. माझ्यावर आरोप करता, पण गुंडांची ओळख मला कशी असणार? माझ्यापेक्षा ती जास्त राणेंना असणार, अशी टीका सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद केली.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, आमदार नितेश राणे फोडत असलेले विजयाचे फटाके त्यांना वाजवता येणार नाहीत. ते फटाके दिवाळीपर्यंत तसेच राहतील आणि नंतर ते मुलांना द्यावे लागतील, अशी टिकाही केसरकर यांनी केली.
ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशा लोकांनी गुंडगिरीवर बोलणे योग्य नाही. राणेंच्या सोबत असलेल्या लोकांची चौकशी केल्यास खून आणि बलात्कारातील आरोपी दिसतील, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही पक्षासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही. निवडणूक काळात एखादी स्टेजवर आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे, याची माहिती आपल्याकडे नसते. त्यामुळे या प्रकरणाचा विरोधकांकडून बाऊ करण्यात आला, असा आरोप केसरकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, विजयाची खात्री सांगत फटाके वाजवण्याची भाषा करणारे आमदार नितेश राणे यांचे फटाके तसेच गाडीत राहणार आहेत. त्यांनी ते दिवाळीला वापरावेत. काही झाले तरी निलेश राणे यांचा पराभव निश्चित आहे, असा त्यांनी दावा केला. मी गृहमंत्री असताना राणेंवर गुन्हे दाखल करू शकलो नाही, असे निलेश राणे यांचे म्हणणे असेल तर त्यांचे आवाहन मी निश्चितच स्वीकारेन. येणाऱ्या काळात त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करू.
राणे माझ्यावर गुंडगिरीचे आरोप करतात, मात्र त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी. निलेश पराडकर हा काही वर्षांपूर्वी राणेंसोबतच काम करत होता. मात्र, आता शिवसेनेत आल्यावर त्याची गुंडगिरी दिसायला लागली. राणेंनी आपल्यासोबत किती जणांना यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणले होते, त्याची यादी आमच्याजवळ आहे. ती योग्य वेळी जाहीर करू. मी पराडकर यांचे समर्थन करणार नाही. त्यांची निश्चित चौकशी केली जाईल. त्याबाबत मी अहवाल मागवला आहे, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.