सरकार उद्योगपतींचे !
By admin | Published: May 24, 2015 10:40 PM2015-05-24T22:40:18+5:302015-05-25T00:32:08+5:30
पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात : भाजपमध्ये फक्त एकाधिकारशाही, मंत्र्यांना अधिकार नाहीत
कऱ्हाड : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी खिशात चेकबुक घेऊन परदेश दौरा करीत सुटलेत. हस्तांदोलन करीत बुके देणं आणि फोटो घेणं हे परराष्ट्र खात्याचं धोरण नसतं; पण उद्योगपतींना खूश करण्यासाठी मोदी हे सर्व करताहेत. सध्याचं सरकार उद्योगपतींचं आहे आणि मोदी या उद्योगपती सरकारचे प्रतिनिधी आहेत,’ असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या गोंगाटात खरी परिस्थिती जनतेसमोर येत नाही. या सरकारने आगळपागळ गप्पा मारल्या, स्वप्नं दाखविली; पण सध्या निराशाजनक परिस्थिती आहे. शेतकरी, गरीब आणि शोषित वर्गाकडे या सरकारचे दुर्लक्ष आहे. सर्व सूत्रे हातात घेऊन नरेंद्र मोदी एकाधिकारशाही गाजवीत परदेश दौरे करताहेत. मोदींना स्वत: परराष्ट्र खातं चालवायचंच असेल तर सुषमा स्वराज यांना त्यांनी दुसरं खातं द्यावं. सुषमा स्वराज चांगल्या संसदपटू आहेत; पण त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय. फक्त मोदी व त्यांचे राईटहँड अमित शहा हे भाजपचे सर्वेसर्वा आहेत. कुठल्याच मंत्र्याला त्यांनी काहीच अधिकार दिलेला नाही. सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांना त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक पाहता त्यांची मानसिकता दिसून येते.
‘स्वच्छ भारत, गंगा शुद्धिकरण, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन’ या कागदावरील गोंडस घोषणा आहेत. एकंदर या सरकारकडून देशाचं काही भलं होताना दिसत नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकालाचा आम्ही निषेध करतो,’ असेही, चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
अल्पसंख्याकांची खोडी काढण्याचा उद्योग
मोदी सरकारच्या प्रत्येक घोषणेला हिंदुत्वाची झालर असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘अल्पसंख्याकांना मुद्दाम डिवचण्याचा, खोडी काढण्याचा त्यांचा उद्योग आहे. अर्थात मोदी स्वत: हे करीत नाहीत; पण जे असं करतात त्यांच्याविषयी मोदी काहीच बोलत नाहीत. भाजपचा एक नेता तुम्हाला बीफ खायचं असेल तर पाकिस्तानात जा, असं वक्तव्य करतो आणि त्यावर मोदी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत हे खेदजनक आहे.’
राज्यातील युती रडतखडत
शिवसेना आणि भाजपची राज्यातील युती रडतखडत चालली आहे. शिवसेना बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, तर राष्ट्रवादी काहीतरी पदरात पडेल म्हणून वाट पाहत आहे. त्यामुळे राज्यातील सरकार स्थिर आहे, असं वाटत नसल्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.