सरकारी वकील सामंत कार्यमुक्त
By admin | Published: October 9, 2015 11:34 PM2015-10-09T23:34:08+5:302015-10-09T23:38:48+5:30
तीन वकिलांची नियुक्ती
सिंधुदुर्गनगरी : गेली साडेआठ वर्षे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या दोन पदांवर यशस्वीरीत्या काम केले आहे. या कालावधीत सरकार पक्षाच्यावतीने लढताना आरोपींना जन्मठेप, फाशी अशाप्रकारच्या शिक्षा दिल्या. दरम्यान, या दोन्ही पदाचा प्रदीर्घ कालावधी संपत असल्याने आपण या पदावरून कार्यमुक्त होत असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अमोल सामंत यांनी दिली. तसेच नव्या जोमाने खासगी दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांची कामे घ्यायला सुरुवात करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्हा सरकारी वकील अमोल सामंत यांच्या सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या दोन पदांचा कालावधी गुरुवारी संपत असल्याने याबाबतची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मार्च २००७ मध्ये जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या पदावर नियुक्त झालो. या दोन पदांवर काम करताना सरकार पक्षाच्यावतीने भरपूर कामे चालवायला मिळाली. महाराष्ट्र राज्यात सर्वांत कमी वयात सरकारी वकील या पदाची जबाबदारी सांभाळणारा पहिला वकील म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली. सगळ्या जिल्हा न्यायमूर्तींचे काम जवळून बघायला मिळाले. तसेच वेगवेगळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे तपासकाम, कामाची पद्धत अनुभवता आली. सर्वांशी जवळच्या ओळखी निर्माण झाल्या. परराज्यातील सरकारी डॉक्टर्स, आयुक्तांपासून लोकांच्या साक्ष घेण्याचा योग आला. सरकार पक्षाच्यावतीने बाजू मांडताना आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. माझ्या कालावधीत आरोपींना जन्मठेप, फाशी, तुरुंगवास आदी शिक्षा झाल्या होत्या. आज या दोन्ही पदांच्या कालावधी संपत असल्याने मी या पदावरून कार्यमुक्त होत आहे. नव्या जोमाने पुन्हा खासगी, दिवाणी व फौजदारी कामे घ्यायला सुरुवात करणार असल्याची माहितीही जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल सामंत यांनी दिली.(प्रतिनिधी)
तीन वकिलांची नियुक्ती
सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी वकील या पदावर वेंगुर्ले येथील सूर्यकांत प्रभु खानोलकर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता अवधूत भणगे व सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्निल सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सरकारी वकील अमोल सामंत हे या पदावरून कार्यमुक्त झाल्याने सहायक अभियोक्ता या पदांसाठी वरील तीन वकिलांची निवड करण्यात आली.