शासकीय वसतिगृह भ्रष्टाचाराचे कुरण : दिलीप तळेकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 03:06 PM2020-02-06T15:06:13+5:302020-02-06T15:08:12+5:30
प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.
कणकवली : कलमठ येथे सुरू असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चुकीच्या पद्धतीने हरकुळ बुद्रुक येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार वसतिगृहाचे अधीक्षक व कर्मचारी करीत असल्याची बाब प्रत्यक्ष पाहणीत समोर आली आहे.
प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.
हरकुळ बुद्रुक येथील वसतिगृहाच्या पाहणीनंतर कणकवली पंचायत समितीच्या सभापती दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, शामसुंदर दळवी, पंचायत समिती अधीक्षक अनिल चव्हाण, पालकर व अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
दिलीप तळेकर म्हणाले, कणकवली पंचायत समिती सदस्य गणेश तांबे यांनी या शासकीय वसतिगृहातील समस्येबाबत माहिती मागविली होती. त्याबाबत त्यांना अधीक्षकांनी दिलेली माहिती खरी आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही अचानक गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य, अधिकारी यांना घेऊन वसतिगृहाला भेट दिली. या भेटीत वसतिगृह अधीक्षक यांनी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली.
या वसतिगृहात सहा कर्मचारी असून त्यापैकी १ कर्मचारी सुट्टीवर होता. तर चार कर्मचारी हजेरीपटावर सही करून गायब होते. फक्त वसतिगृह अधीक्षक एस. पी. जाधव उपस्थित होते. संबंधित वसतिगृहाच्या सर्व रजिस्टरची तपासणी केली असता, गेले २० ते २५ दिवस एकाही रजिस्टरमध्ये माहिती भरण्यात आलेली नव्हती. त्याबाबत विचारणा केली असता अधिक्षकांनी उद्धट उत्तरे दिली.
वसतिगृहाची आम्ही पाहणी केली. तेव्हा गंजलेल्या अवस्थेत कॉट व फाटलेल्या बेडशिट आढळून आल्या. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या उशा खराब झालेल्या होत्या. वसतिगृहाच्या वरील मजल्यावरील शौचालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना खालील मजल्यावर जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.
पोषण आहार खोलीतील चणाडाळ, गहू, तांदूळ या आहाराला कीड लागली होती. हजेरीपटावर ३४ मुले असताना केवळ सात ते आठ मुले हजर होती. तर १७ मुले गैरहजर असल्याचे अधिक्षकांनी सांगितले. संगणक कक्ष बंदावस्थेत होता. वाचनालयही बंद होते़.
त्यामुळे कणकवलीपासून सहा किलोमीटर अंतरावर हे नवे वसतिगृह करण्यामागचे कारण काय? कोणाचीही परवानगी न घेता हे स्थलांतर करण्यात आले. वसतिगृहाचे अधीक्षक त्याठिकाणी न राहता ते कणकवलीत राहत आहेत.
या वसतिगृहाचे भाडे किती देता? असे विचारले असता त्याबाबत माहिती सांगण्यास अधिक्षकांनी टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांचे जेवण स्वयंपाकगृहामध्ये न ठेवता ते हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व बाबींचा विचार करता सर्व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करीत असून मुलांची हेळसांड करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे सभापती दिलीप तळेकर यांनी यावेळी सांगितले.