‘त्यांच्या’ पत्नीला शासकीय नोकरी
By admin | Published: December 22, 2014 12:21 AM2014-12-22T00:21:07+5:302014-12-22T00:21:07+5:30
दीपक केसरकर : सावंतवाडीतील आढावा बैठकीत माहिती
सावंतवाडी : विद्युत तार पडून मृत झालेल्या युवकांच्या पत्नींना महावितरण नोकरीत सामावून घेणार आहे. त्यांना आयटीआयमध्ये प्रथम शिक्षण देण्यात येईल, त्यानंतर त्या नोकरीत रूजू होतील, असा धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर झाल्याची माहिती वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते सावंतवाडी येथे झालेल्या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत बोलत होते. तसेच जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणार असून कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमारन, कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे, तहसीलदार सतीश कदम, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, उपविभागीय अभियंता अनामिका जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी केसरकर यांनी आंबा नुकसानी तसेच बागायतीबाबत खास बाब म्हणून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे याचे अहवाल तातडीने पाठवून देण्याच्या सूचना केल्या. इकोसेन्सिटिव्हबाबत जनसुनावण्या घेण्याचे निश्चित करण्याचे ठरले आहे. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी गावात जाऊन योग्य ती माहिती ग्रामस्थांना द्यावी, असेही अधिकाऱ्यांना सांगितले. हत्तींकडून नुकसानी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी हत्ती पकडण्याची मोहीम तातडीने राबवण्यात येणार आहे. वनविभागाला ३५ लाखाचा निधी कमी पडत असून तो निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले.
ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवक तसेच सरपंच निधी खर्च करत नाही. मोठ्या प्रमाणात निधी मागे जातो, मात्र यापुढे असे होणार नाही. याची दक्षता उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांना घेण्याचे आदेश देण्यात आले. कोणताही अधिकारी- कर्मचारी चुकीचे काम करीत असेल तर त्याबाबत कारवाई करा. तसेच सरपंच चुकीचे काम करण्यास सांगत असेल तर ग्रामसेवकाने कागदावर घ्यावे आणि नंतर ते जिल्हाप्रशासनाकडे पाठवावे, अशी सक्त ताकीद ही ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनीही काही समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)