लेप्टो रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय मदत पथक
By Admin | Published: June 30, 2015 09:50 PM2015-06-30T21:50:20+5:302015-06-30T21:50:20+5:30
दोन्ही ठिकाणी खास माहिती, सहकार्य व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत,
सिंधुदुर्गनगरी : जुलै ते नोंव्हेबर या कालावधीत संशयित लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव होत असतो. या कालावधीत काही गंभीर स्वरुपाच्या लेप्टो व संशयित रुग्णांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय मदत पथक लेप्टो उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर व वैद्यकीय महाविद्यालय, बांबुळी गोवा येथे संदर्भित करावे लागते. या दोन्ही ठिकाणी खास माहिती, सहकार्य व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मंगळवारी प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली.कोल्हापूर येथील कक्षात ए. जी. जोशी (कुष्ठरोग तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी कासार्डे), व्ही. व्ही . घुगरदरे (आरोग्य सहाय्यिका प्राथमिक केंद्र वैभववाडी), पी. के. पाटील (आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्यकेंद्र खारेपाटण) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोवा बांबुळी येथे जी. एस. भणगे (आरोग्यसेवक उपकेंद्र ओवळीये, प्राथमिक आरोग्यकेंद्र आंबोली), एम. एम. करमळकर (आरोग्य सहाय्यक प्राथमिक केंद्र गोळवण), ए. जी. गवस (आरोग्यसेवक दोडामार्ग) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्राथमिक केंद्र मदत, कक्षाचे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालयामधून रुग्णास कोल्हापूर किंवा गोवा येथे संदर्भित करताना त्या विषयाची सर्व माहिती त्वरित साथरोग नियंत्रण कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे दूरध्वनीद्वारे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी हा रुग्ण संदर्भित करण्यात येत आहे त्या रुग्णालयास तातडीने अवगत करण्याची जबाबदारी संबंधित आरोग्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी यांची राहील. जे रुग्ण उपचारासाठी दाखल होतील अशा रुग्णांशी तातडीने समक्ष संपर्क साधून त्यांचेशी चर्चा करुन आवश्यक ते सहकार्य करावे.
उपचारासाठी जे रुग्ण दाखल होतील किंवा उपचाराअंती घरी रवाना होतील अशा प्रत्येक रुग्णांची माहिती त्वरित जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग किंवा डॉ. नामदेव सोडल (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. संजय काळे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. पी. पी. सवदी (जिल्हा साथरोगतज्ज्ञ) यांच्याकडे संबंधित कक्षातील कर्मचाऱ्यांनी तातडीने द्यावयाची आहे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)