Sindhudurg: उन्हाळ्यातील ‘वृक्षारोपण’; रोजगार निर्मितीच्या ‘माईलस्टोन’ ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:25 IST2025-03-04T18:25:27+5:302025-03-04T18:25:54+5:30
प्रकाश काळे वैभववाडी : वैभववाडी उंबर्डे आणि खारेपाटण गगनबावडा मार्गांच्या दुतर्फा अलिकडेच जेसीबीने खड्डे मारण्यात आले. ते कशासाठी हे ...

Sindhudurg: उन्हाळ्यातील ‘वृक्षारोपण’; रोजगार निर्मितीच्या ‘माईलस्टोन’ ची चर्चा
प्रकाश काळे
वैभववाडी : वैभववाडी उंबर्डे आणि खारेपाटण गगनबावडा मार्गांच्या दुतर्फा अलिकडेच जेसीबीने खड्डे मारण्यात आले. ते कशासाठी हे मात्र समजले नव्हते. गेल्याच आठवड्यात त्यामध्ये ‘उन्हाळी वृक्षारोपण’ केले गेले. तेव्हा कळले आपलं सरकार ‘पर्यावरणाचा समतोल’ राखण्यासाठी खरंच काहीतरी करू पाहतंय.
पण गंमत अशी की, उष्णतेने कहर गाठला असताना केलेले ‘सरकारी वृक्षारोपण’ आठवडाभरातच करपून गेले. त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे त्या वृक्षारोपणाला प्लास्टिकच्या जाळ्यांनी संरक्षण केलंय. जे कोणीतरी सहज काढून नेईल. नाहीच नेले तर पुढच्या उन्हाळ्यातील ‘वणव्यात’ हमखास जळून जाईल.
हा उन्हाळी वृक्षारोपणाचा सरकारी कार्यक्रम बहुधा दरवर्षीच होत असतो. त्यातून मजूर, रोपवाटिका व्यावसायिक, प्लास्टिक जाळ्या विक्रेते, पाण्याचे टँकर, ट्रॅक्टर मालक अशा घटकांना रोजगार देऊन त्यांना जगविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शासकीय यंत्रणेतील कोणावरही संशय घेण्यास कुठेही वाव दिसत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात लावलेलं रोपटं जगलंच पाहिजे, अशी शासन निर्णयात कुठेही अट नसावी.
अन्यथा विशिष्ट भागात दरवर्षी होणाऱ्या या सरकारी सोहळ्यातून रस्त्याच्या दुतर्फा गच्च हिरवी वनराई आणि वाटसरूंना शीतल सावली मिळायला काय हरकत होती? असो. नाहीतरी वाढत्या महागाईत पगार पुरतोय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.