शासनाने ‘सी-वर्ल्ड’चे सीमांकन निश्चित करावे !

By admin | Published: September 16, 2016 11:32 PM2016-09-16T23:32:40+5:302016-09-16T23:43:31+5:30

विनायक राऊत : भू-संपादनास स्थगिती म्हणजे ग्रामस्थांच्या लढ्याचा विजय

Government should set boundaries of 'C-World' | शासनाने ‘सी-वर्ल्ड’चे सीमांकन निश्चित करावे !

शासनाने ‘सी-वर्ल्ड’चे सीमांकन निश्चित करावे !

Next

मालवण : ‘सी-वर्ल्ड’बाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. ग्रामस्थांचा वाढता विरोध लक्षात घेता भूसंपादनाचा आदेश स्थगित करण्यात आला असून प्रकल्पविरोधी ग्रामस्थांच्या लढ्याचा हा विजय आहे.
आता शासनाने प्रस्तावित प्रकल्पाचे सीमांकन निश्चित करून वायंगणी-तोंडवळीत सी-वर्ल्ड साकारताना ग्रामस्थांवर अन्याय न करता वाटाघाटीने भू-संपादन करावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. सीमांकन निश्चित केल्यानंतर ग्रामस्थांच्या सहमतीने प्रकल्पाबाबत कार्यवाही केली जाईल. मात्र, यालाही ग्रामस्थांचा विरोध असेल तर जिल्ह्यातच प्रकल्प हलविण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मांडली.
सी-वर्ल्डमुळेच जिल्ह्याचा कायापालट होईल, हा चुकीचा भ्रम आहे. सी-वर्ल्ड ग्रामस्थांना नको असेल तर सिंधुदुर्गातील मुणगे-देवगड येथील जागेचा विचार करावा लागेल. मुणगे येथील जमीन मालक सी-वर्ल्डबाबत सकारात्मक आहेत. काहींनी जमिनी देण्यास समर्थता दाखविली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयांची आठवड्याभरात भेट घेतली जाणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ, आकारीपड, आचरा देवस्थान जमीन, महामार्ग चौपदरीकरण या सर्व प्रलंबित विषयांबाबत खासदार राऊत यांनी तळगाव येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. शासनाने प्रस्तावित केलेल्या सी-वर्ल्ड जागेचे सीमांकन होणे आवश्यक आहे. याबाबत शासनाने अभ्यास करून कार्यवाही करावी. सीमांकन प्रक्रिया झाल्यास नेमकी कोणती जागा बाधित होईल हे निश्चित होणार आहे. ग्रामस्थांवर अन्याय होऊ नये यासाठी वाटाघाटी करावी लागणार आहे. तरीही प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचा विरोध मावळला नसेल तर शासनाने जिल्ह्यातील देवगड-मुणगे अथवा अन्य जागेचा विचार करून ग्रामस्थांच्या सहमतीने जिल्ह्यातच प्रकल्प व्हावा, हीच भूमिका शिवसेनेची असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
बॉक्स - युतीचा निर्णय भाजपवर अवलंबून
जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या युतीबाबत शिवसेना सकारात्मक आहे. युतीचा निर्णय भाजपवरच अवलंबून आहे. भाजप नेत्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, त्यांच्याकडून युतीबाबत अधिकृत सांगण्यात आले नाही. स्थानिक पातळीवर देवगड, मालवणमध्ये दोन्ही पक्षात चांगली चर्चा व समन्वय दिसून येत आहे, तर निवडणूक फॉर्म्युल्याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी युती व्हावी अशी शिवसेनेची अपेक्षा आहे, असे राऊत म्हणाले.
बॉक्स - खड्डेमय महामार्ग आघाडी सरकारचे पाप
राऊत म्हणाले, गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी सर्वच खड्डे बुजविण्यात यश आले नाही. गेल्या आठ वर्षांत महामार्गासाठी एकाही रुपयाचा निधी न मिळाल्याने ही दुरवस्था झाली असून हे आघाडी सरकारचे पाप आहे. यावर्षी जास्तीचा पाऊस तसेच ३० टन पेक्षा अधिक होणारी दिवसरात्र अवजड वाहतूक रस्त्याची चाळण बनण्यास कारणीभूत आहे, तर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून मोबदला देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आले. वागदे व कुडाळ येथील काही भाग वगळता अन्य गावांतील मोबदला सर्वेक्षण प्रस्ताव लवकरच शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहे.

साहित्य वाटपासाठी
केंद्र्रीय मंत्री येणार
मालवणसह जिल्ह्याभरात अपंगांच्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला होता. यातील लाभार्थी अपंग बांधवांचे साहित्यही प्राप्त झाले आहे. केंद्र्रीय मंत्री गेहलोत यांनी साहित्य वितरणासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्री गेहलोत जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
मालवण विकास आराखड्याला स्थगिती
मालवण शहराचा विकास आराखडा नागरिकांना उद्ध्वस्त करणारा आहे. विशिष्ट बिल्डर लॉबीसाठी हा आराखडा फायदेशीर व सामान्य नागरिकांवर अन्यायकारक असा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री स्तरावरून आराखड्याला स्थगिती दिली असून, अन्यायकारक आराखडा रद्द होणार आहे.

Web Title: Government should set boundaries of 'C-World'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.