सरकारी काम, सहा महिने थांब
By admin | Published: February 7, 2017 11:21 PM2017-02-07T23:21:57+5:302017-02-07T23:21:57+5:30
सावंतवाडी वनविभागातील प्रकार : घरावर पडलेले झाड तोडण्याच्या परवानगीसाठी उपोषण
सावंतवाडी : ‘सरकारी काम सहा महिने थांब’ याचा प्रत्यय सावंतवाडीत वासुदेव बांदेकर यांच्या प्रकरणात आला. घरावर पडलेल्या झाडाच्या तोडीची परवानगी मिळविण्यासाठी सहा महिने वाट बघावी लागली. फक्त पडलेले झाड या शब्दाच्या ठिकाणी झाड तोडणे असा शब्द हवा होता. पण वनविभागाने हा शब्द बदलण्यासाठी बांदेकर याना उपोषण करण्यास भाग पाडले.
ऐन पावसाळ्यात घरावर पडलेल्या झाडांची तोड करण्यासाठी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल विजय कदम यांनी परवानगी नाकारल्याने वासुदेव बांदेकर यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी वनक्षेत्रपाल विजय कदम यांची चांगलीच कानउघडणी केली. किरकोळ कारणासाठी लोकांना एवढ्या टोकाची भूमिका घेण्यासाठी का भाग पाडता, असा सवाल केला. त्यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी त्यात हस्तक्षेप करीत बांदेकर यांना तातडीने परवानगी दिली जाईल, असे सांगितले.
वासुदेव बांदेकर हे सावंतवाडी शहरात सबनीसवाडा येथे राहतात. २३ जूनला त्यांच्या घरावर ऐन पावसाळ््यात सागवानाचे मोठे झाड पडले. यात त्याचे सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. मात्र, घटनेदिवशी ६५ मिलीमीटर पावसाची नोंद न झाल्याने बांदेकर यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. मात्र, घरावर पडलेले झाड काढले तर त्याला वाहतूक पास लागणार तसेच वनविभागाच्या परवानगीशिवाय तोड करणेही शक्य नाही. म्हणून बांदेकर यांनी वनविभागाकडे परवानगी मागितली. पण वनविभागाने सुरूवातीला परवानगी दिली. त्यानंतर त्या दिलेल्या परवानगीमध्ये खाडाखोड केली.
याबाबत वासुदेव बांदेकर यांनी वनविभाग तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवादही साधला. पण त्यांना ठोस आश्वासन मिळाले नाही. पालिकेने झाड तोडण्याची परवानगी दिली. पण वाहतूक परवानगी देण्यास वनविभाग टाळाटाळ करीत आहे. या विरोधात बांदेकर यांनी येथील प्रांतकार्यालय परिसरात मंगळवारी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी यात हस्तक्षेप करीत नियमात राहून तातडीने परवानगी दिली जाईल, असे यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर वासुदेव बांदेकर यांनी आपले उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)