ST Strike: सरकारचा अंतिम अल्टिमेटम! सिंधुदुर्गातील १३६५ कर्मचारी अजूनही संपात सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 06:05 PM2022-03-09T18:05:29+5:302022-03-09T18:06:43+5:30
कामावर रुजू होणाऱ्या चालक व वाहकांची संख्या वाढल्यास एसटी सेवा सुरळीत करण्यास प्रशासनास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.
कणकवली : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे यासह आदी मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असल्याने अद्याप यावर तोडगा निघाला नाही. सरकारने दिलेली भरघोस वेतन वाढ आणि आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर हजर देखील झाले आहेत. मात्र पुर्ण क्षमतेने एसटीच्या फेऱ्या अद्याप सुरु झाल्या नाहीत. यानंतर सरकारने आंदोलनकर्त्यांना आता अंतिम अल्टिमेटम दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. संपात अजूनही सिंधुदुर्गातील १८४५ पैकी १३६५ कर्मचारी सहभागी आहेत.१०३ कर्मचारी अधिकृतपणे सुट्टीवर आहेत. तर २१ कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. आतापर्यंत ३६० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. संप सुरूच असल्याने त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांना १० मार्च पर्यंत सेवेत दाखल होण्याचा अंतिम अल्टीमेटम राज्य सरकारने दिला आहे.
तर गेल्या दोन- तीन दिवसात चालक व वाहक मोठ्या संख्येने कामावर हजर होत असल्याचेही एसटीच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी सिंधुदुर्ग विभागातील विविध एसटीच्या आगरात चालक ३१ व वाहक ३८ कामावर हजर होते. कामावर रुजू होणाऱ्या चालक व वाहकांची संख्या वाढल्यास एसटी सेवा सुरळीत करण्यास प्रशासनास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.