वन्य प्राण्यांच्या त्रासाकडे शासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: September 1, 2014 09:44 PM2014-09-01T21:44:14+5:302014-09-01T23:57:24+5:30
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
सावंतवाडी : वन्य प्राण्यांचा त्रास, लहरी पाऊस यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यात भातशेती जमीन पडीक राहिली आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.
भातशेती क्षेत्र झपाट्याने घटत चालले असून शहरीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. मूलत: शेतकरी वर्गाचा तारणहार नसल्यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. काही शेतकरी शेती आणि झाडे विकून उदर निर्वाह करीत असल्याचे दिसून येत आहे.
महिला बचतगट चळवळ वेगाने फोफावत असल्याने शेतमजुरी करण्यास कामगार मिळत नाहीत. कामगार मिळाले तर शेती, मजुरी याचा ताळमेळ बसत नाही. उत्पादनापेक्षा मजुरीला जास्त खर्च करावा लागत असल्याने जमिनी पडीक राहत असल्याचेही कारण सांगण्यात येत आहे. या हंगामात उशिराने पाऊस सुरू झाल्याने तसेच मजूर आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली शेती पडीक ठेवली आहे. त्यामुळे लाकडे तोडणारे आणि जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या दलालांनी जमीन किंवा झाडे विकण्याचा तगादा लावत असल्याचे समोर येत आहे. या आणि अन्य कारणांमुळे शेतकरीवर्ग चहुबाजूंनी संकटात येत असल्याचे दिसून येत असून याचाच फायदा दलाल घेत असल्याचे बोलले जात आहे. संकटांच्या या खाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)