दुसरा पुरावा हस्तगत

By admin | Published: June 23, 2017 01:05 AM2017-06-23T01:05:51+5:302017-06-23T01:05:51+5:30

बांदा खून प्रकरण : तिघा संशयितांना आज न्यायालयात हजर करणार

Grab another evidence | दुसरा पुरावा हस्तगत

दुसरा पुरावा हस्तगत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : बांदा-देऊळवाडी येथील किशोरी सावंत यांचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेली दोरी बांदा पोलिसांनी गुरुवारी सकाळी हस्तगत केली असल्याची माहिती बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिली. तसेच हा खून करताना तिन्ही संशयित आरोपींनी अंगात घातलेले कपडेही पोलिसांनी मिळविले आहेत. सावंतवाडी न्यायालयाने दिलेली पोलीस कोठडीची मुदत आज, शुक्रवारी संपणार असून, या तिघांना आज सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचेही बांदा पोलिसांनी सांगितले.
बांदा-देऊळवाडी येथील किशोरी कृष्णा सावंत या महिलेचा ११ जून रोजी मुस्लिमवाडी भरडावर गळा आवळून खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत संशयित बाबा खान याला १५ जून रोजी कोल्हापूर येथून सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. बाबा खान याने दिलेल्या माहितीच्या आधारे मृत किशोरी सावंत यांच्या शेजारी राहणाऱ्या बाब्या मुळ्ये याला सोमवारी रात्री, तर मुस्लिमवाडीत राहणाऱ्या अश्रफ शेख याला मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली होती. या तिघांकडेही पोलीस या खुनासंबंधी चौकशी करीत होते. मात्र, तिघेही एकमेकांकडे बोट दाखवीत असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तिघांपैकी एकाला विश्वासात घेऊन माहिती घेतली आणि त्यादृष्टीने तपास सुरू केला होता.
किशोरी सावंत यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे या तिघांनीही सांगितले होते. मात्र, यासाठी वापरण्यात आलेली दोरी कुठे आहे हे सांगताना तिघांनीही पुन्हा एकमेकांची नावे सांगितल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता. पुन्हा एकदा याबाबत पोलिसांनी यातील एका संशयिताला बोलते केल्यावर खून झाल्यानंतर ती दोरी बाब्या मुळ्ये याने लपविल्याचे समोर आले.
दरम्यान, खुनानंतर बाब्या मुळ्ये हा थेट आपल्या घरी गेला होता, तर अश्रफ व बाबा मुस्लिमवाडीतून दगडी कुंपण पार करून निघून गेले होते, तर त्याचदिवशी बाबा खान याने तेथीलच एका युवकाला दुचाकीने दोडामार्ग तालुक्यातील आवाडे येथे सोडण्यास सांगितले होते. ही बाबही तपासात उघड झाली आहे. त्या युवकाचा जबाबही बांदा पोलिसांनी घेतला आहे.
कारण गुलदस्त्यातच?
मृत किशोरी सावंत यांच्या खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. बाबा खान याच्याबरोबर असलेल्या वादातून जर हा खून झाला असेल तर बाब्या व अश्रफ यांनी त्याला मदत का केली हा एक प्रश्न आहे, तर बाब्या मुळ्ये व बाबा खान यांनी संगनमत करून हा खून केला असेल तर दारूसाठी पैसे मिळतील या लालसेने अश्रफ या कटात सामील झाला का? याचा तपास करण्याचे आव्हानही बांदा पोलिसांसमोर आहे.

Web Title: Grab another evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.