शासकीय धान्य दुकानांत अजूनही अंगठा लाऊन धान्य वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 PM2021-04-29T16:06:47+5:302021-04-29T16:10:24+5:30
CoronaVIrus Malvan Sindhudurg : कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना, शासकीय धान्य दुकानांवर अद्यापही पॉस मशीनद्वारे अंगठा घेऊन ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरित केले जात आहे.
मालवण : कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना, शासकीय धान्य दुकानांवर अद्यापही पॉस मशीनद्वारे अंगठा घेऊन ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरित केले जात आहे.
सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना याठिकाणी मशीनद्वारे हजेरी घेणे बंद असताना, केवळ रेशनिंगवर मशीनला अंगठा लावण्याचा शासनाचा अट्टाहास आहे. यातून कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. शासनाने याबाबत तातडीने आदेश काढून ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरित करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.
गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने ऑनलाईनऐवजी ऑफलाईन धान्य वितरित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे धान्य वितरण करणे दुकान चालकांना सोपे झाले होते. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कमध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने अनेक वेळा रेंज नसल्यास ग्राहकांना थांबून रहावे लागते.
एकाचवेळी शेकडो ग्राहक धान्य घेण्यासाठी येत असल्याने रेंज नसल्यास विनाकारण दुकानाबाहेर गर्दी होऊन सोशल डिस्टन्स राखणे अवघड जात आहे. कोरोनामुळे रेशनिंग दुकानदार पॉस मशीनद्वारे धान्य वाटपास चांगलेच धास्तावले आहेत.
कोरोना संसर्गाचा धोका
जे लाभार्थी रेशनिंग घेण्यास पात्र आहेत, त्यांना पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा उठवावा लागत आहे. त्यानंतरच त्यांना धान्य दिले जात आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यावर अजूनही लस उपलब्ध नाही. संपर्क टाळणे एवढाच उपाय त्यावर सध्या तरी उपलब्ध आहे. त्यातच रेशनिंग घेण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अनेक जण एकाच मशीनवर अंगठे देत असल्याने त्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.
शासकीय कार्यालयातील ज्या ठिकाणी थमचा वापर होतो. असे सर्व दस्तऐवज बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी केवळ रेशनिंगसाठी हा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पॉस मशीनवर ज्येष्ठ नागरिक, महिलांचे अंगठे हे स्वतः दुकानदारांना त्यांच्या हाताला धरून घ्यावे लागत आहेत. त्यातून दुकानदार आणि ग्राहकांचा संपर्क येत आहे. त्यातच एका मशीनवर अनेकांच्या अंगठ्यांचे ठसे घेतले जातात. त्यामुळे त्यातून कोरोनाच्या संक्रमणाचा धोका असल्याने दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरित करण्याचे आदेश मिळणे आवश्यक आहे.