धान्य गोदामात, वितरण ठप्प
By admin | Published: September 13, 2015 09:53 PM2015-09-13T21:53:09+5:302015-09-13T22:14:15+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सणासुदीच्या तोंडावर गरीब जनतेचे हाल
कुडाळ : गणपतीचा सण तोंडावर येऊनही धान्य दुकानांना अद्याप धान्य वितरीत करण्यात आले नाही तर कुडाळच्या शासकीय गोदामात दोन महिने पुरण्याइतका गहू उपलब्ध असतानाही प्रशासनाने धान्य न दिल्याने गरीब जनता सणासुदीच्या तोंडावर भरडली जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी वालावल मतदारसंघाचे पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.बंगे यांनी म्हटले आहे की, गणपतीचा सण अगदी तोंडावर असताना धान्य दुकानांवर खडखडाट असून, कुडाळच्या शासकीय गोदामात गहू सडत चालला आहे. गहू तुटवडा असल्याने कोल्हापूरहून गहू मागविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, गहू किमान दोन महिने पुरेल एवढा पुरेसा साठा आहे. गोडावूनमधील तो धान्य दुकानदाराला दिल्यास गव्हाचा प्रश्न सुटेल.
तसेच एपीएल शिधापत्रिका धारकांना गेली कित्येक महिने शासकीय कायद्याचा बडगा दाखवून धान्य मिळत नाही. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन एपीएलधारकांनाही धान्य द्यावे, अशी मागणी बंगे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळ जाहीर करा
ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या शेतीवर सध्या करपा आलेला असून, पावसाची आशा संपली आहे. प्रशासनाने याची दखल घेत कोरडा दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना भातपीक नुकसानी देण्यात यावी, अशी मागणी बंगे यांनी केली आहे.
दारिद्र्यरेषेखाली सर्व्हे करा
बरेच गोरगरीब लोक आज ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील असूनही त्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागणार आहे. ज्या लोकांना लाभ मिळायला हवा, त्यांना मिळत नाही. सर्व्हे झाला त्यावेळी काही कष्टकरी कुटुंबे आपल्या रोजंदारीच्या कामासाठी बाहेर असल्याने सर्व्हे करणारे अधिकारी आले, त्यावेळी बंद घरांचा उभे राहूनच सर्व्हे केला. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी बंगे यांनी केली.