ग्रामपंचायतीकडून मनमानी?
By admin | Published: June 7, 2015 11:53 PM2015-06-07T23:53:35+5:302015-06-08T00:49:49+5:30
अनधिकृत बांधकाम : अधिकाऱ्यांविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
चिपळूण : सहहिस्सेदाराला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा त्याची सहमती न घेताच त्याच्या जागेत अनधिकृत बांधकामाला परवानगी देणाऱ्या फुणगूस ग्रामपंचायतीच्या विरोधात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभारामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील मूळ रहिवासी राजेंद्र देसाई हे पोलीस खात्यात शिरगाव पोलीस ठाण्यात सेवेत आहेत. त्यांच्या मालकीच्या फुणगूस येथील सर्व्हे क्र. ७८, उपविभाग ९ मध्ये वडिलोपार्जित वहिवाटीनुसार लागलेल्या सहहिस्सेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता त्या जागेत घराचे बेकायदेशीर बांधकाम सुरु केले. ही जागा सामायिक असून, अद्याप त्याची वाटणीही झालेली नाही. या ठिकाणी बांधकाम होत असल्याने हे बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी करणारे निवेदन देसाई यांनी ग्रामपंचायतीला २० फेब्रुवारी २०१४ रोजी दिले. ग्रामपंचायतीकडून योग्य ती कार्यवाही न झाल्याने त्यांनी गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
फुणगूस ग्रामपंचायतीने घर बांधण्यासाठी परवानगी देताना सहहिस्सेदारांची संमती घेतलेली नाही. सहहिस्सेदारांना यावेळी गृहित धरण्यात आले. गावात अशा अनेक घटना घडत असतात. जमिनीचे कोणतेही मोजमाप झालेले नसताना विनापरवाना बांधलेले घर हटवावे, यासाठी मागणी करुनही ग्रामपंचायत चालढकल करीत आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात राजेंद्र देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याविरोधात न्याय मागण्यासाठी निवेदन दिले आहे.
देसाई हे पोलीस खात्यात असल्याने त्यांना पुरेशा रजा मिळत नाहीत. अशाही स्थितीत आपले वडिलोपार्जित घर असलेल्या फुणगूस गावी घराच्या दारासमोरच आजगावकर यांचे अनधिकृत बांधकाम सुरु झाले. त्यामुळे देसार्इंना अडचण होऊ लागली. सहहिस्सेदारांची संमती नसल्याने परवानगी देण्याबाबत अडचण असल्याचे ग्रामसेवकांनी मिटिंगमध्ये सांगितले. परंतु, सरपंच दिनेश गुरव व इतर सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन घराला परवानगी दिली.
ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत देसाई गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडेही सातत्याने दाद मागून त्यांच्याकडूनही अपेक्षित कार्यवाही झाली नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देसाई यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनानंतर आता पुढे कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फुणगूस भागात सहहिस्सेदाराची परवानगी न घेताच हे बांधकाम करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रश्मी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला याबाबत आता स्पष्ट काही आठवत नाही. आम्ही त्यावेळी योग्य ती कारवाई करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले होते. त्याची चौकशी वगैरे झाली असेल. याबाबत आपण पंचायत समितीशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश कुलकर्णी यांच्या काळातच आले होते. परंतु, त्या निवृत्त होणार असल्याने त्यांनी अंमलबजावणीस चालढकल केल्याची चर्चा आहे.
याप्रकरणी तलाठी भुते यांच्याशी संपर्क साधला असता आपण याप्रकरणी चौकशी करत असून, सरपंच व ग्रामसेवक यांचेही जाबजबाब घेतले जाणार आहेत. आपला वस्तुनिष्ठ अहवाल मंगळवारपर्यंत वरिष्ठांकडे पाठवला जाईल, असे त्यांनी सांगितले. बांधकामाला परवानगी देणे किंवा काढून टाकणे, हा अधिकार ग्रामपंचायतीला असल्याने मुळात या बांधकामाला परवागनी दिली कशी? यासाठीच ग्रामसेवक व सरपंच यांची चौकशी होणे आवश्यक आहे.
देसाई यांनी वर्षा हेमंत आजगावकर यांच्या बांधकामाविरोधात २० फेब्रुवारीला हरकत घेणारा अर्ज ग्रामपंचायतीला दिला. या अर्जाचे वाचन मासिक मिटिंगमध्ये न करताच ग्रामसेवकांनी २६ मार्च २०१४ रोजी आजगावकर यांनी घरबांधणीसाठी मागितलेल्या परवाण्याचा अर्ज २७ मार्च रोजी मासिक मिटिंगमध्ये वाचून त्याला मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी देताना सहहिस्सेदाराच्या तक्रार अर्जाचा विचारही केला गेला नाही. शिवाय माहितीच्या अधिकाराखाली ग्रामसेवकाकडे माहिती मागितली असता तीही अपुरी माहिती देण्यात आली.