ग्रामपंचायतीसह ११ घरे फोडली

By admin | Published: January 20, 2015 11:13 PM2015-01-20T23:13:32+5:302015-01-20T23:50:30+5:30

कलमठमधील प्रकार : महिनाभरातील चौथी घटना ; पोलिसांसमोर आव्हान

Gram panchayat blasted 11 houses | ग्रामपंचायतीसह ११ घरे फोडली

ग्रामपंचायतीसह ११ घरे फोडली

Next

कणकवली : परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून सोमवारी रात्री कलमठ ग्रामपंचायत कार्यालयासह परिसरात अकरा ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांमधून एकूण २१ हजार रोख रकमेसह दागिने चोरण्यात आले. या घरफोड्यांनी पोलिसांना भंडावून सोडले आहे. महिनाभरातील शहर परिसरातील हे घरफोड्यांचे चौथे सत्र आहे. सुप्रिया सुनिल घाडी (रा.कलमठ) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. कणकवली-आचरा मार्गावरील कलमठ ग्रामपंचायत कार्यालय, विठ्ठल मंदिरानजीक दोन घरे, कलमठ शाळेनजीक तीन घरे, बिडयेवाडीतील मठकर संकुलातील तीन घरे, कलेश्वर अपार्टमेंट आणि स्वरूप अपार्टमेंटमधील प्रत्येकी एक फ्लॅट फोडण्यात आला आहे. कलमठ ग्रामपंचायतीचा मुख्य दरवाजासह आतील दुसऱ्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून सामान विस्कटण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयात रोख रक्कम नव्हती. विठ्ठलमंदिर नजीक अनंत मधुसूदन पालकर यांच्या चाळीतील बंद खोली फोडून आतील लोखंडी कपाट उघडले. मात्र, त्यातून काही चोरीस गेले नाही. पालकर यांच्या घरापासून ५० फुटांवरील त्यांच्या सख्ख्या भावाचे एस.एम.पालकर यांचे घर फोडण्यात आले. ते मालवण येथे कामानिमित्त असतात. कलमठ प्राथमिक शाळेसमोरील प्रकाश गोपाळ कदम यांच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या दरवाजाची कडी तोडून लॅच पेचून चोरट्यांनी आत प्रवेश केला. प्रकाश कदम कुटुंबीय मुंबई येथे असतात. आतील बेडरूमचा दरवाजा चोरट्यांना उघडता आला नाही. शेजारीच नीळकंठ यशवंत प्रभू यांच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले. प्रभू पुणे येथे असतात. त्यांच्या घरातून नेमके काय चोरीस गेले हे समजू शकले नाही. काही अंतरावरील कुवळेकर चाळीत भाड्याने राहणाऱ्या सुनिता सुनिल घाडी यांच्या खोलीचे कुलूप तोडण्यात आले आणि आतील कपाटातील रोख ९ हजार रूपये, मंगळसूत्र, अंगठी, कानातील रिंग असा ऐवज चोरण्यात आला. घाडी शेजारच्यांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या.
बिडयेवाडीतील मठकर संकुलातील प्रणय गोळवणकर यांचे बंद घर फोडण्यात आले. गोळवणकर हे ठाणे येथे पोलीस खात्यात वरीष्ठ श्रेणी लिपीक म्हणून काम करतात. त्यांच्या घरातून दागिने चोरीस गेल्याचे समजते. मठकर संकुलातीलच दुसऱ्या इमारतीमधील पोलीस हवालदार अमोल धुमाळे यांचे घर फोडून आतील कपाट फोडण्यात आले. मात्र, या घरात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. धुमाळे हे ओरोस येथे पोलीस स्थानकात रात्रपाळीसाठी थांबले होते. तर त्यांची पत्नी कोल्हापूर येथे ट्रेनिंगसाठी गेली होती. बाजूच्या विंगमधील एम.व्ही.कदम यांचा बंद फ्लॅट फोडण्यात आला. श्रीमती कदम या पुणे येथे आपल्या मुलाकडे गेल्या होत्या. त्यांच्या लाकडी कपाटातील रोख १० हजार रूपये चोरण्यात आले. मात्र, कपाटातच अन्य ठिकाणी ठेवलेले दागिने सुरक्षित राहिले.
कलेश्वर अपार्टमेंटमधील अनिल विद्याधर कुवळेकर यांच्या दरवाजाची कडी उचकटून काढण्यात आली. कुवळेकर कुटुंबीय गेले काही महिने रामगड येथे राहत असून त्यांच्या फ्लॅटमधूनही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. कलेश्वर अपार्टमेंटच्या शेजारच्या स्वरूप संकुलातील विनिता विकास सावंत यांच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आतील कपाटातील २ हजार रूपये चोरण्यात आले. सोमवारीच सावंत कुटुंबीय मुंबईला गेले होते.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथकाला बोलावून तपास करण्यात आला. स्थानिक
गुन्हा अन्वेषणच्या पथकानेही चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी
केली. (प्रतिनिधी)

नाकाबंदी असूनही घरफोड्या वाढल्या

कणकवली शहरात नाकाबंदी, पेट्रोलिंग सुरू असूनही घरफोड्या होत असल्याने पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. गेल्या महिनाभरातील शहर परिसरातील घरफोड्यांचे हे चौथे सत्र आहे. यापूर्वी २३ डिसेंबर रोजी कलमठ नाडकर्णी नगर परिसरातच ४ घरे फोडून ४० हजाराचा ऐवज चोरण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांतच शिवाजीनगर परिसरात चार घरे फोडून साडेतीन लाखांचा ऐवज चोरण्यात आला. १५ जानेवारी रोजी नाथ पै नगरातील दोन फ्लॅट फोडून ८१ हजाराची रोकड चोरण्यात आली होती.

Web Title: Gram panchayat blasted 11 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.