gram panchayat election: ..अन् सिंधुदुर्गातील चराठा येथील विहीर चक्क बोलू लागली, गावात चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:04 PM2022-12-10T13:04:54+5:302022-12-10T13:05:31+5:30
अनंत जाधव सावंतवाडी : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचार ही गावागावांत शिगेला पोचला आहे. अशातच ...
अनंत जाधव
सावंतवाडी : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचार ही गावागावांत शिगेला पोचला आहे. अशातच निवडणुकीचे वेगवेगळे फंडे आता समोर येऊ लागले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील चराठा गावात तर निवडणुकीच्या निमित्ताने एक विहीर बोलू लागली आहे.
वीस वर्षापूर्वी तुमची तहान भागवण्यासाठी माझा जन्म झाला, पण मी बिनकामाची आहे. माझी चूक तरी काय? मग मला व्दोष का देता असे सांगत ही विहीर आता पत्रकाच्या माध्यमातून निवडणूक प्रचारात उतरली आहे. हे निवडणूक पत्रक अनेकांचे मात्र मनोरंजन होत आहे.
गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू आहे. अनेक जण आपल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवत आहे. कुठल्याही पक्षाचे चिन्ह नसल्याने गाव पातळीवर आपले मुद्दे घेऊन प्रत्येकाला या निवडणुकीत सामोरे जावे लागत आहे. अशातच अनेक जण आपल्या पद्धतीने नवनवीन मुद्दे पुढे करताना दिसत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील चाराठा गावात तर असाच एक निवडणूक फंडा सध्या चर्चेला आला आहे.
चराठा येथील तिलारी कॉलनीच्या मागे असलेली विहीर पत्रकाच्या माध्यमातून बोलू लागली आहे. मी विहीर बोलते माझं गाव चराटा तिलारी कॉलनीच्या मागे आहे. माझा जन्म वीस वर्षांपूर्वी झाला. मी अशीच वीस वर्षे बिनकामी पडून आहे. ज्या जनतेची तहान भागवण्यासाठी माझा जन्म झाला, त्याचा उपयोग न करता मी अशीच पडून आहे. माझा वापर का करत नाही की माझ्याकडून काही चूक झाली? म्हणून माझा तुम्ही द्वेष करत आहात? आता तर पंप बसवण्याची निविदा तीन महिन्यापूर्वीच झाली तरी सुद्धा तुम्ही पंप बसवण्याचे काम करत नाहीत. आता तरी त्या तहानलेल्या जनतेसाठी माझा तुम्ही उपयोग करून घ्या जेणेकरून माझा जन्म सार्थकी लागेल, असे म्हटले या पत्रकात म्हटले आहे.
चराट्या गावात गेली अनेक वर्ष पाणी प्रश्न आवासून उभा आहे. अशातच या गावाला नगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तेथील खोदण्यात आलेल्या विहिरी पाणी असतानाही तशाच पडून असल्याने ग्रामस्थांना या विहिरीचे पाणी का दिले जात नाही. स्वतःच्या गावात विहीर असताना दुसऱ्यावर अवलंबून का ठेवण्यात येते असे अनेक प्रश्न या माध्यमातून उभे राहिले आहेत. पत्रकातून विहिर बोलत असली तरी त्याची चर्चा मात्र संपूर्ण गावात सुरू झाली आहे.