ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 02:17 PM2020-12-25T14:17:38+5:302020-12-25T14:20:48+5:30
GramPanchyat Elecation Sindhudurgnews - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते . ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतरच खऱ्या अर्थाने रणसंग्राम सुरू झाला आहे . सिंधुदुर्गातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे त्यांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.
मात्र, स्थानिक स्तरावर अशी आघाडी होऊ शकेल का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्थानिक स्तरावर प्रथमच अशी आघाडी होऊन निवडणूक लढविली जाणार असल्याने ही महाविकास आघाडीसाठी एकप्रकारे अग्निपरीक्षा ठरणार आहे. ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असते, त्यांना जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका थोडया सोप्या होतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रत्येक पक्ष जातीने लक्ष घालत असतो. ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
भाजपाला रोखण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, सतीश सावंत, संदेश पारकर, अमित सामंत, बाळा गावडे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे इतर नेते व पदाधिकारी कोणती रणनीती आखतात हे निवडणूक निकालानंतरच समजू शकणार आहे.
नारायण राणेंना विशेष प्रयत्न करावे लागणार !
नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, ते भाजपवासी झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपनंतर शिवसेना आणि इतर पक्षांचे वर्चस्व ग्रामपंचायतींवर आहे. महाआघाडी झाली तर नारायण राणे यांना पूर्वीप्रमाणेच आपले निर्विवाद वर्चस्व ग्रामपंचायतींवर कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.