ग्रामपंचायत निवडणुकीत मडु-यात युतीला धोबीपछाड, स्वाभिमानचे संजू परब विजयाचे शिल्पकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 09:47 AM2018-09-28T09:47:43+5:302018-09-28T09:50:19+5:30
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मडुरा सरपंचपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली.
सावंतवाडी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मडुरा सरपंचपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली. शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांचा तब्बल २५३ मतांनी पराभव करत साक्षी तोरसकर या विजयी झाल्या आहेत. तर युतीच्या विलासिनी शेर्लेकर यांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली असून, मडुरा हे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात गाव येत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पण या विजयाचे शिल्पकार महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब हे ठरले आहेत.
मडु-याच्या विद्यमान सरपंच वेदिका मडुरकर यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी पोटनिवडणूक लागली होती. महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब हे मडुरा या गावातून येतात. तसेच आगामी विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने शिवसेना भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने आपला पाठिंबा शिवसेना उमेदवार विलसिनी शेर्लेकर यांना दिला होता.
या निवडणुकीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह माजी सभापती अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह पदाधिकारी मडुरा गावात ठाण मांडून होते. तर महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्यासह पदाधिकारी जोरदार प्रचारयंत्रणा राबवत होते. त्यामुळे गेले आठवडाभर या निवडणूकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
शिवसेना भाजपसह महाराष्ट्र स्वाभिमानचे पदाधिकारी आपल्या विजयाचा दावा करत होते. त्यामुळे निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार याचीच प्रतीक्षा होती. बुधवारी निवडणूक पार पडल्यानंतर गुरुवारी येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी होती. तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा महाराष्ट्र स्वाभिमानच्या साक्षी तोरसकर यांना २५३ मते पडली होती. तर युतीच्या विलासिनी शेर्लेकर यांना १२९ मते पडली होती.
पहिल्याच फेरीत तोरसकर या १२९ मतांनी आघाडीवर होत्या. दुस-या फेरीत साक्षी तोरसकर यांना २४३ तर युतीच्या शेर्लेकर यांना १९४ तर तिस-या फेरीत अनुक्रमे १९६ आणि १२८ मते पडली होती. त्यामुळे या निवडणुकीत २५३ मतांनी महाराष्ट्र स्वाभिमानच्या साक्षी तोरसकर या विजयी झाल्या. विजयानंतर महाराष्ट्र स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एकच जल्लोष केला. या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले तालुकाध्यक्ष संजू परब यांना उचलून घेत एकच घोषणा दिल्या. तर शिवसेना भाजप युतीच्या गोटात सन्नाटा पसरला होता.
विजयानंतर जल्लोषात जिल्हापरिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती रवींद्र मडगावकर, माजी तालुकाध्यक्ष सुरेश परब, सभापती पंकज पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्या शर्वणी गावकर, जावेद खतीब, अक्रम खान, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, माजी सभापती राजू परब, नीलेश कुडव आदींसह एकच जल्लोष केला. तर येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाक्याची एकच आतषबाजी केली. पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता