ग्रामपंचायत निवडणुकीत सेना-भाजप एकत्र?

By admin | Published: April 1, 2015 10:12 PM2015-04-01T22:12:58+5:302015-04-02T00:48:06+5:30

खेड तालुका : सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू, गावपातळीवरील राजकारणाला पुन्हा वेग

Gram Panchayat elections together in the Sena-BJP? | ग्रामपंचायत निवडणुकीत सेना-भाजप एकत्र?

ग्रामपंचायत निवडणुकीत सेना-भाजप एकत्र?

Next

खेड : जिल्हाभरात संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि १० पोटनिवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला. या निवडणुका २२ एप्रिल रोजी होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील सर्वच पक्ष आता मोर्चेबांधणी करीत आहेत.सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर गेली ५ वर्षे ते राजकीय वीजनवासात गेले होते. त्यानंतर वर्षभरातच माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर तालुक्यातील शिवसेनेची धुरा सांभाळण्याची वेळ आली. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका आणि पोटनिवडणुकांदरम्यान तालुक्यातील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्येही गटतटाचे राजकारण पाहावयास मिळाले.खेड नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला अगदी काठावर बहुमत मिळवता आले. अनेक बाबतीत पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेदाची दरी रूंदावत चालली होती. याच काळात दापोली विधानसभेचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी आणि जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांच्यात मतभेद निर्माण झाले. यानंतर संजय कदम भरणे जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभे राहिले. यावेळी शिवसेनेचे शशिकांत चव्हाण या निवडणूक रिंगणात होते. भरणे विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही संजय कदम निवडून आले होते़ यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कदम सूर्यकांत दळवी यांच्याविरोधात उभे राहून निवडून आले. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय कदम यांना मदत केल्यानेच कदम निवडून आल्याची चर्चादेखील सुरू झाली. या निवडणुकीत रामदास कदमांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे आणि माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. एकूणच परिस्थिती शिवसेनेचे खच्चीकरण करण्यास पोषक ठरल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले.मात्र, संजय कदम आमदार झाल्याने भरणे जिल्हा परिषद सदस्याची जागा रिक्त झाली आणि या विभागामध्ये २८ जानेवारीस पोटनिवडणूक लागली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे आणि विश्वास दळवी यांसह शांताराम म्हैसकर आणि उधळे येथील बशीर हजवानी यांसारखी सर्व दिग्गज मंडळी या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आली आणि भरणे विभाग पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणला.
शिवसेनेचे सारे दिग्गज एकत्र आले आणि कोणत्याही परिस्थितीत संजय कदम यांना ही निवडणूक जिंकू द्यायची नाही, असा चंग बांधला, तर दुसऱ्या बाजुला भरणे विभाग शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून जतन करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती़ अख्ोर तसेच झाले. आता २२ एप्रिल २०१५ रोजी खेड तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होणार असून, संजय कदम आपली ताकद पणाला लावत आहेत, तर शिवसेनेने आपला मित्रपक्ष भाजपाला सोबत घेऊन लढण्याचे ठरविले आहे. सेना, भाजप आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याने राष्ट्रवादीला एकाकी पाडण्याचे डावपेच आखले जात आहेत. रामदास कदम आणि अनंत गीते यांच्याच नेतृत्त्वाखाली आजपर्यंतच्या सर्व निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये यशही मिळाले. यामुळे १९९५ ते २०१५ दरम्यानची शिवसेना पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने शशिकांत चव्हाण यांच्यासह रामदास कदम आणि अनंत गीते यांच्याकडेच निवडणुकीची सूत्र सोपवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


राष्ट्रवादीसमोर आव्हान ?
1दरम्यान, सेना पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठकांचा अश्व आता सर्वत्र उधळू लागल्याने आणि राज्यातील सत्तेचा परिणाम होऊ लागल्याने राष्ट्रवादीला सोपे राहिले नाही. सेना-भाजपचे सहकार्यदेखील आहे. अशावेळी सेनानेते रामदास कदम आणि खासदार अनंत गीते यांच्यात समेट होणे आवश्यक आहे. मात्र, तो कधी होणार या विचारानेच इथले शिवसैनिक बुचकाळ्यात सापडले आहेत़
2खेड तालुक्यातील शिवसेनेच्या ग्रामपंचायती यावेळी सेनेच्या ताब्यातून घेण्यास आमदार संजय कदम सरसावले आहेत़
3खेडमधील अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या पक्षाकडे याव्यात, यासाठी विविध पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना-भाजपबरोबरच आता राष्ट्रवादीनेही प्रचाराला सुरुवात केली आहे.
4शिवसेना-भाजपच्या साथीने खेड तालुक्यावर आपले वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरतो का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Gram Panchayat elections together in the Sena-BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.