सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही मोजावे लागतात पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:18 PM2022-12-07T12:18:08+5:302022-12-07T12:18:48+5:30
सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीने जाण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकातील उल्लेख केलेल्या व्यक्तींनाच विनामूल्य प्रवास
मालवण: सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर आणि स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही आता किल्ल्यात नौकेने जाण्यासाठीचे पैसे मोजावे लागणार आहेत. मेरीटाईम बोर्डाच्या बंदर निरीक्षकांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर ५ कर्मचारी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने नियुक्त केले असून या कर्मचाऱ्यांच्या तिकिटांचा भुर्दंड आता ग्रामपंचायतीला सहन करावा लागणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग किल्ला वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या या भूमिकेवर वायरी भूतनाथ ग्रामपंचायत काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर जमा करण्यासाठी चार महिला कर्मचारी तर एक सफाई कामगार वायरी भूतनाथ ग्रामपंचायतिने नियुक्त केले आहेत. किल्ल्यावर जायचे असल्यास मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत असलेल्या किल्ले प्रवासी होडी वाहतुकीची तिकीट काढून होडीने किल्ल्यावर जाता येते.
यासाठी प्रौढांना १०० तर लहान मुलांना ५० रुपये असे तिकिटाचे दर आहेत. अंध, अपंग, मूकबधिर, कार्यालयीन कामकाजासाठी जाणारे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी, विद्यार्थी यांना ही सेवा विनामूल्य असल्याचा हुकूमनामा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे. तशा आशयाचा फलक मालवण येथील बंदर जेटीवर मेरीटाईम बोर्डाकडून लावण्यात आला आहे
योग्य ती कार्यवाही केली जाईल
वायरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. डी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत आमच्याशी मेरीटाईम बोर्डाने कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग किल्ला हा आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे स्थानिक प्राधिकरणाला विश्वासात घेऊन मेरीटाईम बोर्डाने निर्णय घ्यायला हवा होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि अभ्यागत कर जमा करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. भविष्यात या कर्मचाऱ्यांना किल्ला प्रवासी होडी वाहतुक करण्यास अटकाव करण्यात आल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही केली जाईल.
तर तिकिटात सवलत देऊ - अरविंद परदेशी
सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीने जाण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकातील उल्लेख केलेल्या व्यक्तींनाच विनामूल्य प्रवास करता येईल. सदरील कर्मचारी सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशी नसल्यास त्यांना तिकीट काढूनच किल्यात जावे लागेल. मात्र ग्रामपंचायतीने आमच्याशी पत्रव्यवहार केल्यास आम्ही त्यांना तिकिटात सवलत देऊ शकतो असे सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी यांनी सांगितले.