स्मार्ट ग्रामसाठी मांगवलीची निवड, ग्रामपंचायतीला पत्र प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:52 AM2019-03-14T11:52:07+5:302019-03-14T11:56:38+5:30
वैभववाडी तालुक्यातील मांगवली ग्रामपंचायतीची शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेसाठी निवड झाली आहे. स्मार्ट ग्राम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवडीचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी १० लाख रुपये विशेष निधी मिळणार आहे.
सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील मांगवली ग्रामपंचायतीची शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेसाठी निवड झाली आहे. स्मार्ट ग्राम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवडीचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी १० लाख रुपये विशेष निधी मिळणार आहे.
राज्यात आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविली जात होती. ती योजना राज्य शासनाने २०१६ मध्ये बंद करुन त्या योजनेचे स्वरुप व अंमलबजावणीत बदल करीत स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे ग्रामपंचायतींना स्वयंमुल्यांकनाद्वारे योजनेत सहभागी होऊन ठोस निधी मिळविण्याची संधी उपलब्ध करुन दिली असून तालुक्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतीला १० लाख तर जिल्ह्यात निवड झालेल्या ग्रामपंचायतीला तब्बल ४० लाख रुपये निधी दिला जातो.
स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या बाबींशी संलग्न मुद्द्यांसाठी १०० गुण स्मार्ट ग्राम योजनेत निर्धारित करण्यात आले आहेत. त्यानुसार मांगवली ग्रामपंचायतीने स्वयंमुल्यांकनाद्वारे ६५ गुणांच्या पुर्तता करुन योजनेत सहभाग घेतला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीमार्फत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्यात आली होती.
गतवर्षी मांगवली ग्रामपंचायतीने आयएसओ दर्जा मिळविल्यानंतर प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता ग्रामपंचायतीची तालुक्यातून स्मार्ट ग्रामसाठी निवड झाली आहे. यामध्ये सरपंच राजेंद्र राणे, उपसरपंच संतोष ईस्वलकर, ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामसेवक उमेश राठोड व कर्मचा-यांचे विशेष योगदान आहे.
स्मार्ट ग्रामचा निधी नाविन्यपूर्ण योजनांवर होणार खर्च!
स्मार्ट ग्राम योजनेसाठी निवड झाल्यामुळे मांगवली ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी १० लाख रुपये निधी मिळणार आहे. या निधीतून ग्रामपंचायतींनी शासनाने निर्धारित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन व त्यापासून खत निर्मिती, जलशुध्दीकरण प्रकल्प (आरओ प्लांट), सौर पथदिवे, बायोगॅस सयंत्र निर्मिती(बायोमास गॅसिफायर) आदी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासंबंधी शासनाचे निर्देश आहेत.
मांगवली ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्रामसाठी निवड झाली असून गावातील विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे.