सिंधुदुर्गातील टंचाई अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे ग्रामपंचायतींनी प्राधान्याने पूर्ण करावीत : केसरकर
By admin | Published: May 6, 2017 05:42 PM2017-05-06T17:42:06+5:302017-05-06T17:42:06+5:30
पाणी टंचाई आढावा बैठक ीत दिल्या सूचना
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. 0६ : टंचाई अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे ग्रामपंचापयतींनी प्राधान्याने पूर्ण करावीत. ज्या ग्रामपंचायती अशी कामे प्राधान्याने पूर्ण न करता अपूर्ण ठेवतील त्यांना भविष्यात शासनाची कामे दिली जाणार नाहीत तसेच जिल्हा परिषदे मार्फत अशा ग्रामपंचायतीवर योग्य कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पाणी टंचाई आढावा सभेस अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, विकास सुर्यवंशी, निता शिंदे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याचा पाणी पुरवठा हा महत्वाचा विषय असतो. या अनुषंगाने पाणी टंचाई निवारणार्थ सूचविलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करुन पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, पाणी टंचाई अंतर्गत ज्या ग्रामपंचायती अशी कामे अपूर्ण ठेवत असतील त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची कारवाई केली जाईल.
जिल्ह्यात ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे व ग्रामस्थांची मागणी आहे अशा ठिकाणांची तपासणी करुन तहसिलदारांनी त्या गावासाठी किंवा वाडीसाठी टँकर सुरु करावा. उपविभागीय अधिका-यांनी संबधित तहसिलदार व गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाशी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांशी बैठक घेऊन अपूर्ण कामांचा आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
सिंधुदुर्ग किल्ला, सजेर्कोट बेट तसेच किनारपट्टीवरील त्या गावात- वाड्यांत खा-या पाण्याची समस्या जाणवते अशा ठिकाणी आर-ओ प्लॅन्ट बाबत तातडीने पाहणी करुन प्रस्ताव द्यावेत, बोअरवेल मधील लोखंडी पाईप खा-या पाणी व हवामानामुळे गंजतात अशा ठिकाणी पीव्हीसी किंवा जी-आय पाईप घालण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा, टंचाई ग्रस्त भागात सर्वेक्षण करुन विहिर पुर्नभरणाचा प्रस्ताव द्यावा, कोरड्या पडलेल्या विहिरीत बोअरचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही पालकमंत्री केसरकर यांनी या बैठकीत दिल्या.
विहिरी खोल करण्यासाठी आवश्यक क्रेन साठी अशा दोन नविन क्रेन घेण्याबाबत तसेच निवीदा काढून पोर्टबल बोअरवेल मशिन घेण्याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने त्वरीत सादर करावा, असेही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. पाणी टंचाई कामांबाबतचा सविस्तर आढावाही यावेळी घेण्यात आला.