कणकवलीत निघाली भव्य 'आरक्षण बचाव' रॅली; काँग्रेस, राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
By सुधीर राणे | Published: October 5, 2024 04:09 PM2024-10-05T16:09:03+5:302024-10-05T16:09:41+5:30
नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसह महायुती व आरपीआयचे कार्यकर्ते, आरक्षित समाज बांधव एकवटले
कणकवली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यावर देशातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज, शनिवारी कणकवली शहरातून भाजपसह महायुती व आरपीआय तसेच आरक्षित समाजाने भव्य रॅली काढली. यावेळी आरक्षण वाचविण्याचा नारा देण्यात आला. भर उन्हात या रॅलीत महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजीमुळे ही रॅली लक्षवेधी ठरली.
काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत या रॅलीला जानवली नदीवरील पुलाजवळून प्रारंभ झाला. त्यानंतर कणकवली बुद्धविहार येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', 'भारतीय संविधानाचा विजय असो', 'आरक्षण हटवू पाहणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली पोहचल्यावर त्या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. आमदार नितेश राणे तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. या सभेनंतर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त!
या रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.