अकोल्यातील ‘आजोबा’ आढळले नापणेत

By admin | Published: December 27, 2015 12:09 AM2015-12-27T00:09:44+5:302015-12-27T00:16:38+5:30

पोलिसांनी दिले नातेवाइकांच्या ताब्यात : बारा डिसेंबरला झाले होते बेपत्ता

The 'grandfather' of Akola found out | अकोल्यातील ‘आजोबा’ आढळले नापणेत

अकोल्यातील ‘आजोबा’ आढळले नापणेत

Next

वैभववाडी : अकोला येथून अवघे दहा रुपये घेऊन १२ डिसेंबरला बेपत्ता झालेले ८८ वर्षीय दशरथ कोठीदास गोके (रा. हरिहर पेठ, अकोला) तब्बल चौदाव्या दिवशी नापणे येथे कडाक्याच्या थंडीत बेशुद्ध अवस्थेत आढळले. वैभववाडी पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा शोध लागला. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या आजोबांना नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, दशरथ गोके डॉक्टर असलेला मोठा मुलगा प्रकाश यांच्याकडून दहा रुपये घेऊन १२ डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास घरातून निघून गेले होते. ते घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईक व मित्रमंडळींकडे शोधाशोध करून १९ डिसेंबरला अकोला जुने शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
नापणे रेल्वे स्थानकाकडून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला धनगरवाड्यानजीक शुक्रवारी सकाळी वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळले. ग्रामस्थ महादेव जैतापकर यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक दशरथ घाडीगावकर यांनी त्यांना रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. नवनाथ कांबळे यांनी तातडीने उपचार सुरू केले. सुमारे दोन तासांनी आजोबा शुद्धीवर आले.
आजोबा शुद्धीवर आल्यावर घाडीगावकर यांनी विचारपूस केली तेव्हा आपण अकोल्याचे असल्याचे स्पष्ट करीत दशरथ गोके यांनी आपले नाव सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलाचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला. त्यामुळे नातेवाइकांशी पोलिसांनी तत्काळ संपर्क साधला. त्यावेळी १२ डिसेंबरला ते घरातून बाहेर पडल्याचे स्पष्ट करीत १९ रोजी तक्रार दिल्याचे सांगून आपण लगेच वैभववाडीला निघत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी वृद्ध
गोके यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल होताच गोके आजोबांना त्यांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
आजोबांचा पुनर्जन्म ?
अवघे दहा रुपये घेऊन अकोल्याहून निघालेले दशरथ गोके चौदाव्या दिवशी कडाक्याच्या थंडीत नापणे रेल्वे स्थानकापासून पाचशे मीटरवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांचा हा जणू पुनर्जन्मच असल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली. दरम्यान, आपण सोलापुरात आल्याचेच आठवते. त्यानंतर पुढे काय झाले काहीच माहीत नाही, असे दशरथ गोके सांगतात.

Web Title: The 'grandfather' of Akola found out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.