आजीबाईने अठरा दिवस काढले अंधारात, न्हावेली रेवटेवाडी येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 06:25 PM2020-08-14T18:25:53+5:302020-08-14T18:27:20+5:30
सर्वांच्या घरी लख्ख प्रकाश आणि आपल्या घरी अंधार या विवंचनेत असलेल्या न्हावेली-रेवटेवाडी येथील जयश्री सोनू परब या आजीबाईच्या घरात १८ दिवसांनी वीज आली.
सावंतवाडी : सर्वांच्या घरी लख्ख प्रकाश आणि आपल्या घरी अंधार या विवंचनेत असलेल्या न्हावेली-रेवटेवाडी येथील जयश्री सोनू परब या आजीबाईच्या घरात १८ दिवसांनी वीज आली.
दुरुस्तीसाठी आलेले वायरमन म्हणाले की, म्हातारे तिया आमका दु:ख दितय, आम्ही काय करूचा? ती व्यथा आजीने पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. वीज बिल कायम वेळेत भरणाऱ्या ग्राहकांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आजीबाईची समस्या जाणून घेण्यासाठी न्हावेली ग्रामपंचायत माजी सदस्य सुशील नागवेकर, पाडलोस शिवसेना शाखाप्रमुख महेश कुबल, भाजप सावंतवाडी युवामोर्चा सरचिटणीस काका परब रेवटेवाडी येथे गेले होते. परंतु सकाळीच संबंधित वायरमननी वीजपुरवठा सुरळीत केल्याचे आजीने सांगितले.
जयश्री परब यांच्या घरात विद्युत पुरवठा करणारी लाईन सोनुर्लीतून असल्यामुळे बांद्यातील वायरमन पुरवठा बंद झाल्यास लक्ष देत नाहीत. रेवटेवाडीतील बहुतांशी मीटर बांदा लाईनवर असून ते सोईस्कर आहेत. त्यामुळे बांदा व सोनुर्ली लाईनच्या वादात जयश्री परब यांना अंधारात दिवस काढावे लागले. तीन घरांचा विद्युत पुरवठा बांदा लाईनवरून करावा किंवा देखभालची कामे बांदा लाईनवरील वायरमनने करावी, अशी मागणी नागवेकर यांनी केली आहे.