संजीवकांसाठीचे अनुदान रखडले
By admin | Published: September 10, 2016 11:22 PM2016-09-10T23:22:06+5:302016-09-11T00:27:13+5:30
कृषी विभाग : मान्यतेसाठी खटाटोप, पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार
रत्नागिरी : हंगामापूर्वी उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी कृषी संजीवकांचा वापर करतात. हजारो रूपयांची ही संजीवके रोखीने विकण्यात येतात. अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या बागायतींसाठी संजीवकांचा अधिक खर्च करावा लागतो. तसेच बोगस संजीवकांमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांची फसगत होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, त्यांना मान्यताप्राप्त कंपन्यांची संजीवके कमीतकमी किंमतीत उपलब्ध व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून कृषी आयुक्तालयाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही संजीवके वापरण्याचा हंगाम संपला तरी अद्यापही कृषी आयुक्तालयाकडून यासाठी मान्यता मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांना पुढील वर्षापर्यंत या अनुदानासाठी वाट पाहावी लागणार आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह््यात ४० हजार लीटर कृषी संजीवकांची विक्री होते. आंब्याला लवकर मोहोर व फळे येण्यासाठी विविध कंपनीच्या कृषी संजीवकांचा वापर शेतकरी व बागायतदार करतात. जिल्ह््यात १७ ते २० हजार लीटर संजीवकांची विक्री होते. सध्या विविध कंपन्यांनी पीक संवर्धन संजीवके बाजारात आणली असून, शासनमान्य ३ ते ४ कंपन्यांच्या संजीवकांना प्राधान्याने शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
जिल्ह््याला अर्थार्जन मिळवून देणाऱ्या आंबापिकाची एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र हे उत्पादनक्षम आहे. कल्टार, सेलस्टार, लगान, पॅकहोल्टार आदी विविध कंपन्यांच्या संजीवकांची ४००० ते ७००० रूपयांच्या घरात विक्री सुरू आहे. ही संजीवके रोख किंमतीने विकण्यात येतात. अनेकवेळा बोगस संजीवकांमुळे फसगत झाल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व त्यांना मान्यताप्राप्त कंपन्यांची संजीवके कमीतकमी किमंतीत उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ही संजीवके उपलब्ध व्हावीत, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. संजीवकांच्या मूळ किंमती व शेतकऱ्यांना करण्यात येणारी विक्री याबाबतचे दरपत्रक एमईडीसीमार्फत आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले आहे. आयुक्तालयाकडून कृषी विभागाची मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये पैसे भरल्यास निम्म्या किंमतीत कृषी संजीवके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्याचा हंगाम संपला असला तरीही कृषी विभागाने आपला पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. जेणेकरून या हंगामात नाही, तर निदान पुढील हंगामात तरी अल्पदरात ही संजीवके उपलब्ध व्हावीत.
हंगामापूर्वी पीक आल्यास फळाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी, बागायतदार संजीवकांचा वापर करतात. मात्र, जे शेतकरी कृषी संजीवकांचा वापर करत नाहीत, त्यांनी बागायतीमधील रान, गवत काढून टाळ-माती, खते घालण्यास प्रारंभ केला आहे. संजीवके वापरण्याचा ठराविक कालावधी असतो. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने आॅगस्टअखेर शेतकऱ्यांनी संजीवके बागायतींना दिली आहेत. (प्रतिनिधी)
यावर्षी कृषी संजीवकांच्या किंमतीही भरमसाठ असल्याने निम्म्या किंमतीत ही संजीवके शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने आयुक्तांकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत आता राज्य शासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. मात्र यंदाचे अनुदान रखडण्याची शक्यता आहे.