घरकुलाचे अनुदान पोहोचलेच नाही
By admin | Published: February 12, 2016 09:55 PM2016-02-12T21:55:06+5:302016-02-12T23:45:58+5:30
योजनांपासून वंचित राहणार : जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभेत माहिती उघड
ओरोस : घर दुरुस्तीचे व घरकुलांचे प्रस्ताव व अनुदान लाभार्थींपर्यंत पोहोचलेले नाही. वर्ष संपल्यानंतर हे अनुदान खर्चही करता येणार नाही. त्यामुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत सदस्य धोंडू पवार यांनी उपस्थित केला.बॅ. नाथ पै सभागृहात समाजकल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तसेच समाजकल्याण अधिकारी कमलाकर रणदिवे, सुरेश ढवळ, सुकन्या नरसुले, प्रतिभा घावनळकर, धोंडू पवार, आस्था सर्पे, पुष्पा नेरूरकर तसेच खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
आपल्या मतदारसंघातील लाभार्थ्यांना आर्थिक वर्ष संपत आले तरीही अद्याप घरकुलाचा व घर दुरुस्तीचा निधी मिळाला नसल्याचे सदस्य धोंडू पवार यांनी सभागृहात सांगितले. यावेळी आपल्याच नाही तर बऱ्याच मतदारसंघातील लाभार्थ्यांना अपूर्ण प्रस्तावांमुळे हा निधी मिळालेला नाही, असे सांगितले.यावेळी लाभार्थ्यांच्या अपूर्ण प्रस्तावातील त्रुटी दूर करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सभागृहाला दिली. याबाबत उपस्थित सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त करत अपूर्ण प्रस्ताव का घेण्यात आले? असा प्रश्न विचारत सभापतींना धारेवर धरले. यावर सभापतींनीलोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर अपूर्ण प्रस्ताव घ्यावे लागत असल्याचे सांगितले. या प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यामुळे त्या दूर करण्यास वेळ लागता आहे. परिणामी लाभार्थी लाभापासून वंचित रहात असल्याचे सभापती अंकुश जाधव यांनी सांगितले. तसेच यापुढे परिपूर्ण प्रस्तावच घ्यावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. (वार्ताहर)
नोटीस पाठवून खुलासा घ्या
धनगर, भटक्या जमाती आदींच्या विकासासाठी शासनाने तांडावस्ती सुधार योजना सुरु केली आहे. मात्र, या योजनेचे प्रस्ताव उशिरा येत असल्याने सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून याबाबत खुलासा मागवावा, असे यावेळी सदस्यांनी सूचित केले.
खुलासा मागवण्याचे आदेश
या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सन २०१५च्या आदेशाची फेब्रुवारी २०१६मध्ये पूर्तता करुन हा आराखडा सादर करण्यात आला आहे. परंतु, आराखडा सादर करण्यास एक वर्षाचा कालावधी का लागला, याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी यावेळी दिले.