राजवाडीत सामूहिक प्रयत्नाने फुलला शेतीचा मळा
By admin | Published: January 18, 2015 11:21 PM2015-01-18T23:21:10+5:302015-01-19T00:22:54+5:30
सिंचनाखाली जमिन : पुण्यातील संस्थेच्या देणगीवर उभा राहिला प्रकल्प...
मिलिंद चव्हाण - आरवली=संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील ग्रामस्थांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सामूहिक प्रयत्नातून बंधाऱ्यातील पाणी दीड किलोमीटर अंतरावर आणून शेतीचा प्रयोग केला आहे. यासाठी येणारा सर्व खर्च पंधरा शेतकऱ्यांनी निधी संकलन करुन आणि पुण्यातील संस्थेच्या देणगीवर केला आहे. ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले असून, येथील १५ एकर जमिन सिंचनाखाली आली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
संगमेश्वर पासून महामार्गाजवळ काही अंतरावर असणारे हे गाव, राजवाडीची गोधडी तर साता समुद्रापार गेली आहे. यासह कागदी पिशव्या, शेळीपालन सारख्या व्यवसायातून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करुन, येथील शेतकऱ्यांनी यापूर्वीच आदर्श घालून दिला. यासाठी विविध संस्था, स्थानिक ग्रामपंचायत आदींचाही यात महत्त्वाचा वाटा आहे.
भातशेती हे एकच उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेऊन कोकणातला शेतकरी राबत असतो. यात पालेभाज्या, फळे, कडधान्य इत्यादीच्या लागवडीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकते. ही गोष्ट आता येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येऊ लागली आहे. मात्र, यासाठी पाणी ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी राजवाडीचे सरपंच संतोष भडवलकर यांनी ‘पेम’ संस्थेचे सतीश कामत यांच्या सहकार्याने येथील शेतकऱ्यांना एकत्र केले. यांना सामूहिक शेतीसाठी प्रोत्साहित केले. ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. या गोष्टींना विरोध झाला. कालांतराने शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यात यश आले. गावातील जमिनमालकांना एकत्र आणून, त्यांची जमीन वापरण्याची परवानगी सामंजस्याने घेण्यात आली आणि येथील पंधरा शेतकऱ्यांनी हा विडा उचलला.
या शेतकऱ्यांनी निधी संकलन केले. कामत यांच्या माध्यमातून पुण्यातील ‘बन्सुरी फाऊंडेशन’ या संस्थेने दीड लाखाची देणगी दिली. ग्रामस्थांनी प्रत्येकी सहा हजार रुपये काढून लाखभर रुपये जमा केले. एकात्मिक पाणलोट योजनेतून एक लाखाचा प्रस्ताव दिला. मात्र, आजही तो लाल फितीत अडकून पडला आहे. सरपंच संतोष भडवलकर यांनी एक लाखाची तूट भरुन काढत, साडेतीन लाखाची योजना अस्तित्त्वात आणली.
गावाच्या एका बाजूला दीड किलोमीटर अंतरावर बाराही महिने पाणी असणारा बंधारा आहे. जिथे १५ अशा शक्तिचा पंच लाऊन जलवाहिनी टाकण्यात आली आणि पाणी उचलण्यात आले. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. पराग हळदणकर यांनी शेतकऱ्यांना पिकाविषयी माहिती दिली आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मुळा, लाल माठ, वांगी, चवळी, मिरची यांची लागवड करण्यात आली. काही दिवसातच शेतकऱ्यांना या पिकांचे उत्पन्न मिळू लागेल.