तहानलेल्या ३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’ने पाणी देणार

By admin | Published: October 26, 2015 11:37 PM2015-10-26T23:37:49+5:302015-10-27T00:12:53+5:30

रवींद्र वायकर : जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून योजनेचा सर्व्हे

Gravity will give water to thirsty 35 villages | तहानलेल्या ३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’ने पाणी देणार

तहानलेल्या ३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’ने पाणी देणार

Next

चिपळूण : कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मिती झाल्यानंतर वाशिष्ठी नदीत पाणी सोडले जाते. यातील काही पाणी खेड, चिपळूण तालुक्यातील ३५ गावांना ग्रॅव्हिटीने देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या गावांचा सर्व्हे करण्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. ही एक नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज (सोमवारी) येथे सांगितले.
जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून या योजनेचा सर्व्हे केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ गावांना ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होणार आहे. उर्वरित गावांना पुढील टप्प्यात पाणी दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तहानलेल्या गावांना कमी खर्चात शुद्ध पाणी मिळणार आहे. नळपाणी योजना राबवण्यासाठी प्रत्येक गावाचा सर्व्हे केला जाणार आहे. याबाबतची सूचना जीवन प्राधिकरणला देण्यात आली आहे. भविष्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे वायकर यांनी सांगितले.
नगर परिषदेतर्फे वाशिष्ठी नदीकिनारी जुन्या बाजार पुलानजीक नवीन पूल बांधण्याचे काम सुरु असून, या कामासाठी मंजूर झालेला निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी व्यक्त केली. विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या कामांना चालना मिळावी. याकरिता आपण मंजूर निधी मिळविण्यासाठी नगर परिषदेला आवश्यक ते सहकार्य करु, असे आश्वासन पालकमंत्री वायकर यांनी दिले. (वार्ताहर)


सोसायटी निर्माण करणार
शहर परिसरात जागा उपलब्ध झाल्यास म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायटी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वसामान्यांना बँकेकडून कर्ज सुविधा देण्याचाही आपला प्रयत्न आहे. पोलिसांसाठीही स्वत:चे घरकुल कसे उभे राहील, यासाठीही शासन स्तरावरुन लक्ष दिले जाणार असल्याचे रवींद्र वायकर यांनी सांगितले.

कदमांचा समाचार
माजी उपजिल्हाप्रमुख दादा कदम यांना पक्षशिस्त कळलेली नाही. त्यामुळे ते आरोप करीत आहेत, असे वायकर यावेळी म्हणाले. पर्यटन विकास योजनेंतर्गत ६७० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ७५ कोटीपैकी ५० कोटी निधी मंजूर आहे. गणपतीपुळे, रत्नागिरी, गुहागर येथील पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

Web Title: Gravity will give water to thirsty 35 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.